लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील वाळकी येथे सहा वर्षांपासून रखडत पडलेल्या पाण्याच्या टाकीचे चार दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. चार दिवस पाणीपुरवठा केल्यानंतर ही टाकी अचानक कोसळली. यामध्ये एक तरूणी गंभीर जखमी झाली आहे.राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक व आदिवासी विकास निधीच्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत २०१३ मध्ये हे काम सुरु झाले होते. ते पूर्ण होण्यास २०१९ साल उजाडले. त्यातही गुत्तेदाराने घिसडघाई केल्याने कामाचा कोणताच दर्जा राखता आला नाही. त्यामुळे उद्घाटनानंतर चार दिवसांत टाकी कोसळण्याचा प्रकार घडला. गावातील १४६० लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न त्वरित निकाली निघावा, यासाठी २० मे रोजी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन सरपंच राघोजी काळे, नागनाथ राऊत, संबंधित कार्यकारी अभियंता व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले होते.चार दिवस ओलांडताच सदरील पाण्याची टाकी जमीनदोस्त झाली. पाणी भरण्यासाठी मीरा मुकाडे (२०) ही तरुणी पाणी भरण्यासाठी गेली असता तिच्या अंगावर बांधकाम पडल्यामुळे गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हिंगोली येथे उपचार सुुरु आहेत. गावातही फक्त चारच दिवस पाईपलाईनद्वारे पाणी सोडले.मारोती धनवे यांच्या घरासमोर बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनानंतर केवळ चारच दिवसांत दर्जाहीन बांधकामामुळे जमीनदोस्त झाल्याने चौकशी करून दोषीविरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी वाळकी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे.याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांकडे तक्रारी केल्या असून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वाळकी येथे पाण्याची टाकी कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:38 PM