वसमत: आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबतच असल्याची भूमिका आ. राजू नवघरे यांनी स्पष्ट केली. यापुढे पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचा निश्चयही त्यांनी आज आयोजित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली असून कोणाच्या बाजूने राहावे याबाबत आमदारांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आ. राजू नवघरे पाटील देखील प्रथम संदिग्ध भूमिकेत होते. दरम्यान, आज सकाळी मतदारसंघात येताच त्यांनी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. तसेच यापुढे पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.
याबैठकीस कृऊबा सभापती तानाजी बेंडे, अंबादासराव भोसले, त्र्यंबक कदम, उपसभापती सचिन भोसले, चंद्रकांत बागल, दौलत हुंबाड, मुंजाजी दळवी, बाबूराव दळवी, चंद्रकांत दळवी, अयुब पठाण यांच्यासह शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.