- रमेश कदम आखाडा बाळापूर (हिंगोली) : आमचीच खरी शिवसेना अशी छाती पिटणाऱ्यांनी बाळासाहेबांचा धनुष्यबाण काँग्रेस-राकाँकडे गहाण टाकला होता. गहाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला. म्हणून आम्हीच खरी शिवसेना आणि खरी शिवसेना आमचीच, असे सांगत उद्धव ठाकरे गटावर टीका केली.
आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प हा कार्यकर्त्यांचा व शिवदुतांचा मेळावा पार पडला. खा. हेमंत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मंचावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, आ .बालाजी कल्याणकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आनंद जाधव, आ. संतोष बांगर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय हा काही माझ्या स्वार्थासाठी घेतला नव्हता. शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला काँग्रेस-राकाँच्या घरात बांधून ठेवले होते, गहाण ठेवले होते. एक शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन झाले नाही. उद्धव ठाकरे यांनी गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला. देशातील रामभक्तांचे आणि बाळासाहेबांचे स्वप्न होते की, आयोध्या येथे राम मंदिर बांधायचे. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी पूर्ण केले. बाळासाहेबांचे खरे हिंदुत्व जपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याने आम्ही हिंदुत्वाला साथ दिली आहे. राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना दिले आहे. परंतु त्यांनी रामलल्लाच्या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला. रामाच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युती करत आहे. त्यांचे हिंदुत्व खरे आहे का ? हे आपणच शोधा.
एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे, याचे पोटशूळ उठतेय. हे उठण्याचे कारण नाही. हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री शेती करत आहेत असा आरोप केला जात आहे. हेलिकॉप्टरमधून फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली बरी असा टोला लगावत ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले होते.