हिंगोली : जिल्ह्याच्या विकासात शासनाची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वयाने व सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात आयोजित स्वागत व निरोप कार्यक्रमात पापळकर बोलत होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात स्त्रोत कमी आणि आव्हाने अधिक आहेत. यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवत व सहकार्य करीत जिल्ह्याच्या विकासकामांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही पापळकर म्हणाले. प्रास्ताविक नगर पालिका प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शंतनू पोले यांच्या चमूने गीत सादर केले. त्या गितातून शुभेच्छा दिल्या. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आभार मानले.
कोविड, नैसर्गिक आपत्तीसारखी आव्हाने समोर होती...
हिंगोलीत सुमारे पावणेतीन वर्षांच्या कार्यकाळात कोविड, नैसर्गिक आपत्ती यासारखी अनेक आव्हाने समोर होती. परंतु सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने चर्चा करत प्रत्येक आव्हान स्वीकारून यशस्वीपणे कामे केले. जिल्ह्यातील रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून देणे, रामलीला मैदानाचे सुशोभिकरण, अपंग पुनर्वसन केंद्र स्थापन करणे आदी कामे करता आली, असे मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
प्रास्ताविक नगरपालिका प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.