लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला कृषी विभागाच्या आदिवासी उपाययोजना व विशेष घटक योजनेतील विहिरींच्या देयकांचा मुद्दा अखेर कृषी संचालकांच्या आदेशानंतर निकाली निघाला आहे. सर्व पंचायत समित्यांतूनच ही देयके अदा करण्यास सांगण्यात आले आहे.२0१६-१७ मध्ये आदिवासी उपयोजनेतून नवीन २२७ विहिरी व ३६ इतर बाबींना म्हणजे मोटार पंप, पाईपलाईन, जुन्या विहिरींचे खोदकाम आदी बाबींना मंजुरी मिळाली होती. यापैकी २२ विहिरी त्याच वर्षात पूर्ण झाल्या व देयकेही अदा झाली होती. तर सध्या ३६ देयके आली आहेत. मात्र ही देयके अदा करण्यासाठी निधीच नाही. यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांच्याकडे मागणी केली आहे. या कार्यालयाने लवकरच निधी अदा करण्यात येईल, असे सांगितले आहे. १.४५ कोटींचा हा प्रस्ताव आहे. इतर सुरू असलेली कामेही टप्प्या-टप्प्याने पूर्ण होत असून देयके सादर होत आहेत.देयके अदा होत नसल्याचा मुद्दा प्रथम जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी मांडला होता. आज अंकुश आहेर यांनीही स्थायीत तो मांडला.वाळूसह गिट्टीही मिळेनाअनेक विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले मात्र वाळू व गिट्टीअभावी पुढील काम थांबले आहे. कळमनुरी तालुक्यात तर वाळूसह गिट्टीही मिळत नसल्याची बोंब आहे.विशेष घटक योजनेत २0१६-१७ या आर्थिक वर्षात ४२८ विहिरी व १३0 इतर बाबींना मंजुरी मिळाली होती. यापैकी ७१ विहिरी त्याच वर्षी पूर्ण झाल्या व देयकेही अदा झाली. मात्र ८८ देयके जि.प.त प्रलंबित आहेत. ती कोणी अदा करायची यातच मागील दोन महिने निघून गेली. यावर निर्णय न झाल्याने शेवटी कृषी संचालकांच्या पत्रानुसार पं.स.ला ती पाठविली जाणार आहेत. तर या योजनेत ११६ विहिरींचे खोदकाम झाले असून १४५ ची कामे प्रगतीत असल्याचे सांगण्यात आले.
विहिरींची देयके पं.स.तून मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:28 AM