हिंगोली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. सध्या परीक्षा घ्याव्यात की नाही, यावर मतभिन्नता असली, तरी परीक्षेबाबत अद्याप स्पष्ट भूमिका शासनाने घेतली नाही. त्यामुळे पालकांसह विद्यार्थीही संभ्रमात सापडले आहेत. टप्प्याटप्प्याने का होईना परीक्षा झालीच पाहिजे, असे मत हिंगोलीतील शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या भूमिकेनंतरच राज्य शिक्षण विभाग भूमिका घेणार असले, तरी अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नाही. त्यामुळे ११ वीचे प्रवेश कसे द्यायचे, या प्रश्नासह बारावीची परीक्षा घ्यायची की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण व प्रवेश परीक्षेचे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होणे गरजेचे असल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. शिवाय परीक्षा रद्द केल्या तर हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असा सूरही शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे. मात्र, कोरोनामुळे सध्यातरी परीक्षा द्यायची विद्यार्थ्यांची मानसिकताच नसल्याचे मतही विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. शिवाय परीक्षा घ्यायची ठरली, तरी किमान एक महिना तरी विद्यार्थ्यांना अभ्यासाला द्यावा लागणार आहे. जिल्ह्यात बारावीचे १४ हजार ३८७ विद्यार्थी आहेत. तसेच जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ९ हजार ७० विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले आहेत.
काय असू शकतो पर्याय...
मेडिकल, इंजिनिअरिंग आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे बारावीची परीक्षा व्हायलाच पाहिजे. लेेखी परीक्षा घेण्यास अडचण येत असेल, तर ऑनलाईन तरी घ्यावी.
- शिवाजी पवार, माजी शिक्षणाधिकारी तथा शिक्षणतज्ज्ञ
टप्प्याटप्प्याने का होईना बारावीची परीक्षा घेणे आवश्यक आहे. परीक्षा रद्द होत राहिल्यास हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसेच त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होईल. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच हवी.
- गोवर्धन अण्णा विरकुंवर, शिक्षण तज्ज्ञ
बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी बारावीचे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
- देवीदास गुंजकर, शिक्षणतज्ज्ञ
परीक्षा वेळेवर होतील म्हणून खूप अभ्यास केला; मात्र परीक्षा घेण्यासंदर्भात अद्यापही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे मानसिक दडपण येत आहे. कोणताही निर्णय लवकर घ्यावा.
- गजानन खराटे, कौठा
बारावीत चांगले गुण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, कोरोनामुळे परीक्षाच होतील की नाही, याचे निश्चित नाही. परीक्षा वेळेवर झाल्या असत्या, तर निकाल वेळेवर लागला असता. तसेच नीटचा अभ्यास करता आला असता.
- नीता जाधव, बोराळा
मे महिना संपत आला तरी बारावीच्या परीक्षेचे काहीच ठरत नाही. केलेला अभ्यास वाया जात आहे. परीक्षा रद्द झाल्या तर सगळेच उत्तीर्ण होतील. परंतु, गुणवत्तेचे काय? परीक्षेसंदर्भातील निर्णय लवकर घ्यावा.
- बालाजी गाडेकर, बोराळा
जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - १४,३८७
मुली - ६४३७
मुले - ७९५०