गोरेगाव (हिंगोली ) : कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी प्रचार सभेत सोयाबिनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने सभेत उभे राहून पाशा पटेल यांना जाब विचारला.
९ नोव्हेंबर रोजी रात्री गोरेगाव येथे पाशा पटेल यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी पटेल यांनी सोयाबीन भावाचा मुद्दा उपस्थित करताच काही शेतकऱ्यांकडून प्रतिप्रश्न विचारले. यावेळी 'संपूर्ण भाषण ऐकून घ्या' असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना शांत बसण्याची विनंती केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी जागेवरून उभे राहात घोषणाबाजी केली तसेच सोयाबीनच्या भावाबाबत जाब विचारला.
सोयाबीनचे घसरलेले भाव आणि खाद्यतेलांची वाढलेली किंमत याची तुलना करीत कर्जमाफी, पिकविमा, बेरोजगारी आदी प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केले जात आहेत. सोयाबीनला प्रतिक्विंटल मिळत असलेला अत्यल्प दर बघता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमधून जाहीर नाराजी व्यक्त होत आहे.