हिंगोली : कोरोनाच्या लसीकरणाचा वेग आता वाढू लागला आहे. मात्र, वेगवेगळ्या कंपन्यांची लस लसीकरणासाठी उपलब्ध होत आहे. ते लक्षात ठेवणे तेवढेच महत्त्वाचे असून दोन वेगवेगळ्या कंपन्यांची लस घेतल्यास त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी काहीच फायदा होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
देशात अनेक ठिकाणी अनावधानाने अथवा गलथानपणाचा कळस म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या कंपनीच्या लस घेतल्या. लसींचे हे कॉकटेल मानवी शरीरावर विपरित परिणाम करेल, अशी शक्यता नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे कोरोनापासून सुरक्षितता मिळेल, याचीही शाश्वती नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी योग्य व प्रशिक्षित मनुष्यबळ नेमून लसीकरण केंद्रावर तपासणीनंतरच दुसरा डोस देण्याचे निर्देश दिले जात आहेत. तरीही जिल्ह्यात चार ते पाच जणांना वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन डोस दिल्याच्या चर्चा कायम रंगतात. जिल्हा परिषदेतच असा एक प्रकार घडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती एक अफवाच असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमका हा प्रकार घडला की नाही, हे कळायला मार्ग नाही. नागरिकांनीही आपण पूर्वी लस घेतल्याची चिठ्ठी जपून ठेवून दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
पाच ते सहा प्रकरणे केवळ चर्चेतच
हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाने दोन वेगवेगळ्या लसी देण्याचा प्रकार घडू नये, यासाठी वयोगटानुसार लसींचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरणच बंद झाले. आता दोन्ही कंपनीच्या लसी ४५ वयापुढील सर्वांना दिल्या जात आहेत. तर दुसरा डोस घेण्यासाठी येताना चिठ्ठी आवश्यक आहे. तरीही चार ते पाच जणांनी वेगवेगळ्या कंपनीच्या दोन लस घेतल्याची चर्चा कायम आहेत. याबाबत आरोग्य विभागाकडे मात्र कोणतीच तक्रार नाही.
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?
चिठ्ठी तपासूनच दुसरा डोस दिला जातो. त्यामुळे अशी चूक शक्य नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या कंपनीची लस घेतली तर परिणामकारकता राहणार नाही
-डॉ. प्रेमानंद ठोंबरे, लसीकरण समन्वयक
नागरिकांनी लस घेताना पूर्वी कोणती घेतली होती हे तपासूनच लस घ्यावी. एकाच कंपनीच्या दोन्ही लसी घेतल्या तरच कोरोनापासून बचाव होणार आहे.
-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
लसीकरणाच्या कर्मचाऱ्यांना पूर्वी जो डोस दिला त्याच कंपनीचा दुसरा डोस देण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चूक होणे संभव नाही. मात्र, अनावधानाने असे घडलेच तर कोरोनापासून बचावाचा परिणाम साधला जाणे अवघड आहे.
डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्हांतर्गत झालेले लसीकरण
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस ४३१३८, दुसरा डोस ११६१०
वय ४५ ते ६०
पहिला डोस ३४५०६, दुसरा डोस १०९४०
वय १८ ते ४५
पहिला डोस ५७८५
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस ६९७४, दुसरा डोस ४४५९
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस १२३३४, दुसरा डोस ४०३३