हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात कृषी विभागाकडून १ लाख ५६ हजार ८४४ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही हरभरा आणि गहू या पिकाखालील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. त्यानुसार, ५१ हजार ३२६ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. येलदरी, सिद्धेश्वर, इसापूर या मोठ्या प्रकल्पांसह छोटे, मध्यम प्रकल्प, नदी-नाल्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीही वाढ झालेली आहे. पर्यायाने बहुतांश शेतकऱ्यांकडे यंदा ओलिताची सुविधा असल्याने रबी हंगामातील प्रमुख पीके असलेल्या हरभरा आणि गव्हाच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ होणे अपेक्षित आहे.जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ८४४ हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून त्यात सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे व त्याखालोखाल गहू आणि ज्वारी या पिकांचा पेरा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही वर्षांप्रमाणे यंदाच्या हंगामातही करडई, सूर्यफूल या गळीत धान्य पिकांच्या क्षेत्रात घट होण्याचे संकेत आहेत.
प्रस्तावित पेरणी क्षेत्रासाठी बियाणे बदलाचे प्रमाण निश्चित करून एकूण ५१ हजार ३२६ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. रबी हंगामाच्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत एकूण ६२ हजार ८३३ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यात युरिया १७ हजार ६७ टन, डीएपी ११ हजार ७५७ टन, पोटॅश ६ हजार ११७ टन, संयुक्त खते (एनपीके) २० हजार ८९२ टन, सिंगल सुपर फॉस्पेट ७ हजार टन या खतांचा समावेश आहे, अशी माहिती कृषी अधीक्षकांनी दिली आहे.