'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:58 PM2022-02-25T20:58:18+5:302022-02-25T20:58:25+5:30
'वर्गमित्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तयार केलेल्या बंकरमध्ये सुरक्षित लपले असल्याचा संदेश मिळतोय.'
रमेश कदम
आखाडा बाळापुर- सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनला ताब्यात घेतल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भारतातील अनेकजण युक्रेनमध्ये अडकून पडले असून, त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या तीन वर्षापासून युक्रेनमधील कीफ शहरात वास्तव्यास असलेला आखाडा बाळापूर येथील रहिवासी कुटुंबियांच्या आग्रहामुळे घरी पोहोचला. घरी पोहोचताच तिकडे युद्धाला तोंड फुटले आणि त्याचे वर्गमित्र तिथेच अडकले. ते सध्या दुसऱ्या महायुद्धावेळी बांधण्यात आलेल्या बंकर्समध्ये लपले असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद शायान जकी कुरेशी हा मित्रांच्या सुरक्षिततेसाठी अस्वस्थ आहे. रोजचे साथी युद्धखोर परिस्थितीत अडकल्याने जीवाची घालमेल होतेय.
आखाडा बाळापूर येथील रहिवासी कांग्रेसचे जेष्ठ नेते अॅड. जकी कुरेशी यांचे चिरंजीव मोहम्मद शायान कुरेशी हा वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी युक्रेनला गेला आहे. तेथे बोगोमेलेट्स नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, किफ येथे वैद्यकीय पदवीचे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो युक्रेनच्या किफ शहरात राहतो. त्याने युक्रेनमधील परिस्थिती आपल्या शब्दात सांगितली. तो म्हणाले, नित्याचे व्यवहार आणि शिक्षण पद्धती सुरळीत सुरू होती. एक दिवस आगोदर पर्यंत युद्धजन्य वातावरण असल्याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. या काळात युद्ध शक्य नाही अशी भावना समस्त विद्यार्थ्यांची होती. परंतु रशिया - युक्रेन युद्ध होईल अशा बातम्यांमुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते. सारखा फोन करून घरी येण्याचे सांगत होते. कुटुंबियांच्या या प्रेमळ दबावामुळे पंधरा दिवसांसाठी म्हणून मी युक्रेन वरून परत निघालो.
22 तारखेला युक्रेनवरुन विमानाने दिल्लीला निघालो. रात्री साडेअकरा वाजता दिल्लीत पोहोचलो, तेथून हैदराबाद येथे आलो आण 24 तारखेला सकाळी आखाडा बाळापुर येथे घरी पोहोचलो. फ्रेश होऊन कुटुंबीयांसोबत बोलत असतानाच युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटल्याचे कळले. परमेश्वराच्या कृपेमुळे योग्य वेळी घरी येण्याची बुद्धी मिळाली आणि मी घरी सुखरूप आलो. परंतु महाराष्ट्रातले मित्र तिथे अडकले आहेत.
नांदेड ,औरंगाबाद, परभणी, पुणे, मुंबई येथील अनेकजण माझे वर्गमित्र असून ते तिथेच अडकले आहेत. तासातासाला आमचा त्यांच्याशी संवाद सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धात बांधलेल्या बंकरमध्ये ते सध्या लपून बसलेत. रशियाच्या बाॅंबहल्ल्यानंतर हे बंकर्स उघडण्यात आले आहेत. शहरांमध्ये सातत्याने सायरन वाजत असून धोक्याचे इशारे मिळत आहेत. बंकरमधून बाहेर येऊ नये यासाठीचेही संदेश मिळत आहेत. मी जरी घरी आलो असलो तरी मित्रांसाठी मात्र माझा जीव कासावीस झाला आहे अशी भावना मोहम्मद शायान कुरेशी याने व्यक्त केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तो युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहे. आता युद्धाच्या काळात कुटुंबीयांसमवेत असल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर युक्रेनमध्ये अडकले असून त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात असेही मोहम्मद शायान याने सांगितले. या तीन वर्षात युक्रेनमधील स्थानिक रहिवासी असलेले ही अनेक मित्र जोडले गेले आहेत. भारतातील मित्रांना परतण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे .परंतु तेथील स्थानिक मित्रांचे कसे होईल? यासाठी मात्र माझे मन बैचेन असल्याचेही तो सांगतो.