हिंगोली : आता ज्येष्ठांचे लसीकरण हळूहळू वाढत चालले आहे. अनेक कुटुंबातील ज्येष्ठांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. मात्र या घरातील अनेक तरुण कामासाठी बाहेर जात असताना त्यांना मात्र लसीकरणाद्वारे सुरक्षित केले नाही. त्यामुळे पुन्हा धोका घोंघावतच असल्याने त्यांचे लसीकरण कधी? असा प्रश्न ज्येष्ठांना सतावत आहे.
हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील जवळपास १० लाख नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. आतापर्यंत १ लाख २१ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी २८ हजार ८१० जणांनाच दुसरा डोस दिल्याने एवढीच लोकसंख्या सध्या सुरक्षित अथवा सुरक्षिततेच्या उंबऱ्यावर आहे. हे प्रमाण तीन टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातच १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांतील ज्येष्ठांनी लस घेतली असली तरीही लस न मिळालेल्या तरुणांची चिंता त्यांना सतावत आहे. तरुणांना लस न मिळाल्याने त्यांना आजार झाल्यास लहान मुलांमार्फत ज्येष्ठांना धोका आहेच. जरी लस घेतल्याने सुरक्षितता मिळणार असली तरीही परिणामकारकतेची खात्री ७० ते ८० टक्केच आहे. त्यामुळे ही भीती सतावत आहे.
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लस मिळावी !
आम्ही ज्येष्ठांनी लस घेतली. मात्र घरातील तरुण मंडळी अजून वंचित आहे. ते नियमित बाहेर पडत असतात. त्यांनाही सुरक्षितता महत्त्वाची आहे.
-सूर्यकांत कान्हेड
ज्येष्ठांना आधी लस देण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र तरुणांनाही देणे तेवढेच गरजेचे आहे. कामासाठी बाहेर पडणारा हा घटक आहे.
- अतुल रोकडे
मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र कुटुंबातील तरुणांनाही लस मिळावी. कामासाठी बाहेर पडणाऱ्या या घटकामुळे सर्व कुटुंबाला सुरक्षा मिळेल.
-चंद्रकुमार जयस्वाल
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
ज्येष्ठ पहिला डोस ३८,७०६ दुसरा डोस ११,१०७
४५ ते ६० पहिला डोस २९,७६९ दुसरा डोस ९,५८३
१८ ते ४४ पहिला डोस ५,७८५ दुसरा डोस ०००