हिंगोली : शहरात ६८ कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजना तयार केली आहे; परंतु या भूमिगत गटार योजनेला घराचे सांडपाणी कधी जोडले जाणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
२९ नोव्हेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने भूमिगत गटार योजनेंतर्गत शहरात १२४ किलोमीटरमध्ये हे भूमिगत गटाराचे काम सुरू केले होते. ३१ डिसेंबर २०२० मध्ये हे ६८ कोटींचे काम पूर्ण झाले आहे. या १२४ किलोमीटर लाइनवर ५ हजार ३० चेंबर बसविण्यात आले आहेत. लोखंडी चेंबर गंजून जाते म्हणून काम सुरू करतेवेळेस सिमेंटचे चेंबर या लाइनवर बसविण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या वसाहतीमध्ये एसटीपी (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) चे १५ एमएलडीचे बांधकाम पूर्णही करण्यात आले आहे. शहरातील आझम कॉलनी व स्मशानभूमी परिसरात दोन विहिरी तयार करण्यात आल्या असून, शहरातील सर्व घाण पाणी या विहिरींमध्ये जाऊन त्यानंतर प्लाँटमध्ये त्याचे शुद्धीकरण करून ते कयाधू नदीमध्ये सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. योजना पूर्ण झाली असली तरी शहरातील घराचे सांडपाणी या भूमिगत गटार योजनेला कधी जोडले जाणार, हा मूळ प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गटार योजनेसाठी झाल्या बैठका...
शहरातील भूमिगत गटार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या होत्या. सद्य:स्थितीत गटार योजनेचे काम पूर्ण झाले असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
पाइपलाइन जोडणी करून घ्यावी...
शहरातील भूमिगत गटार योजना पूर्ण झाली असून, नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी गल्लीतील रस्त्यांमध्ये न सोडता मोठ्या लाइनमध्ये सोडावे. घराचा ड्रेनेज पाइप मुख्य वाहिनीला जोडतेवेळी तो फुटणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेच आहे. पाइप जोडण्यापूर्वी नगर परिषदेला सूचना दिल्यास अधिक योग्य होईल.
-डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी