हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आला तरी अद्याप मोफत धान्य गावांमध्ये पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य लाभार्थींना कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दूध विक्री केंद्र, दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ, व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे, तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले अन् धान्यही मिळाले नसल्याने गरिबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे धान्य अद्याप गावांपर्यंत पोहोचले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मोफत धान्य कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहेे.
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा
संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप कोणतेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?
- प्रताप बलखंडे, साळवा.
संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.
- शिवाजी दराडे, यडूद.
मोफत धान्य देण्याची घोषणा होऊन पंधरा दिवस होत आले आहेत, तसेच संचारबंदीची मुदतही संपत आली आहे. तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- ज्ञानेश्वर पातळे, गोरेगाव.
मोफत धान्य काय मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नसल्याचा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.
एकूण रेशनकार्डधारकांची संख्या- १८८८७३
रेशनकार्डचा प्रकार रेशनकार्डधारकांची संख्या
अन्न सुरक्षा १३१८३८
अंत्योदय २६३५९
शेतकरी ३०७७६