औंढा नागनाथ : सिंचन विहीर व गाईचा गोठ्यास वर्क ऑर्डर देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी ३ वाजेदरम्यान पंचायत समिती कार्यालयात रंगेहात पकडले. मनोहर खिलारी असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.चार महिन्यांपूर्वी काकडधाबा येथील तक्रारदारास सिंचन विहीर व गोठ्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु, या कामाची वर्कऑर्डर देण्यासाठी गट विकास अधिकारी मनोहर खिलारी याने ५ हजाराची मागणी केली. तक्रारारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. एसीबी पथकाच्या पडताळणीनंतर आज पंचायत समिती कार्यालयात सापळा लावण्यात आला.
दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून मनोहर खिलारी पाटील याने ५ हजारांची लाच स्वीकारली. याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत गटविकास अधिकारी खिलारीस रंगेहात पकडले.