हिंगोली : ‘बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी ३ हजारांची लाच स्विकारणार्या ग्रामसेविका दगूबाई आनंदराव खोंडे वर्ग ३ च्या महिला कर्मचार्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता हिंगोली शहरातील आनंदनगर येथे महिला कर्मचार्याच्या राहत्या घरी करण्यात आली.
सेनगाव तालुक्यातील जांभरून तांडा येथील शामराव चव्हाण व त्यांच्या पत्नी मजूर आहेत. त्यांना बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे होते. परंतु जांभरून तांडा ग्रामपंचायत येथे कार्यरत ग्रामसेविका दगूबाई खोंडे यांनी सदर प्रमाणपत्रासाठी ४ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत शामराव चव्हाण यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यावरून ८ जानेवारी रोजी तक्रारीची पथकाने पडताळणी केली. व ९ जानेवारी रोजी सापळा रचून दगूबाई खोंडे यांच्या राहत्या घरी असलेल्या कार्यालयात कारवाई केली.
यावेळी ग्रामसेविका खोंडे यांना एसीबीच्या पथकाने तीन हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापुरकर, पोनि नितिन देशमुख, जितेंद्र पाटील, पोहेकॉ शेख उमर, सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, पोना शेख जमीर, ओमप्रकाश पंडीतकर, विजयकुमार उपरे, संतोष दुमाने, महारूद्रा कबाडे, पोशि प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, आगलावे आदींनी केली.