गावातच मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची कामासाठी भटकंती होऊ नये म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सिंचन विहीर, तलाव, घरकुल बांधकाम, वृक्षारोपण, बंधारा उभारणे आदी कामे मजुरांना उपलब्ध करून दिली जातात. सध्या ग्रामपंचायतींनी कामाची मागणी केल्यास तत्काळ कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या २७२ ग्रामपंचायतींनी रोहयो कामाची मागणी केली असून औंढा तालुक्यातील ३९, वसमत ५५, हिंगोली ५७, कळमनुरी ६८ तर सेनगाव तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत. एकीकडे काही ग्रामपंचायती रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी जिल्ह्यातील जवळपास २९१ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामेच सुरू नसल्याचे समोर आले आहे. अगोदरच कोरोनामुळे मागील तीन ते चार महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने कामगार त्रस्त आहेत. त्यात ग्रामपंचायतीमध्येही रोहयोची कामे सुरू नसल्याने मजूर कामाच्या शोधात असल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
औंढा - ६२
वसमत - ६४
हिंगोली - ५४
कळमनुरी- ५७
सेनगाव - ५४
रोहयोवर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती - १२०
सरपंच काय म्हणतात...?
कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळे गावातच मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे. पाठपुरावा सुरू असून, सर्वांनाच रोजगार मिळाल्यास होणारे स्थलांतर रोखण्यात मदत होईल.
- शोभाबाई नायक, सरपंच, सवना.
गावातच रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसा पाठपुरावा सुरू असून, रोहयोची जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांना दिलासा मिळेल.
- धम्मदीक्षा खंदारे, सरपंच केंद्रा बु.
कोरोनामुळे अगोदरच काम मिळत नव्हते. त्यामुळे रोहयोची कामे सुरू होवून हाताला काम मिळेल, असे वाटत् हाेते. मात्र रोहयोची कामे सुरू नसल्याने कामासाठी मुंबईला सहपरिवार यावे लागले.
- अमोल पाईकराव, मजूर.
कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना ग्रामपंचायती रोहयोची कामे उपलब्ध करून देत नाहीत. काही ठिकाणी कामे सुरू असली तरी सर्वांनाच काम मिळत नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून द्यावीत.
- राजू इंगोले, मजूर.
१३ हजार मजुरांच्या हाताला काम
जिल्ह्यात २९१ ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू नसली तरी २७२ ग्रामपंचायतीमध्ये कामे केली जात आहेत. यावर औंढा तालुक्यात १ हजार ६८९, वसमत १ हजार ७८२, हिंगोली ३ हजार ७०५, कळमनुरी ३ हजार ४१७ तर सेनगाव तालुक्यात २ हजार ५३६ मजूर काम करीत आहेत. यामध्ये सर्वाधिक कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत.