हिंगोली : आमचा लढा आरएसएसविरुद्ध आहे. ही गैरसंविधानिक संघटना देश, संविधान मानत नाही. तरीही प्रशासन चालवत आहे. ही संघटना संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा जे कुणी आम्हाला देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.
हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे केंद्र शासन अविवेकी भूमिका घेत आहे. त्याचाच परिपाक म्हणून सध्या देशात काही घडामोडी घडत आहेत. प.बंगालच्या ममता बॅनर्जी व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच केंद्राच्या सीबीआयची परवानगी काढून घेतली. आता कलकत्त्याचा एपिसोड हे केंद्राचे निव्वळ नाटक आहे. कायदा व सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे. तर प.बंगालमध्ये कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र एक कागद बनला की तो पाच विभागांना जातो. त्यामुळे ती मिळतील. जर राज्य ऐकत नसेल तर योग्य पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयात जाता येते.
संविधानाने एककल्ली व सर्वोच्च अधिकार कुणालाच दिले नाहीत. एकमेकांचे नियंत्रण ठेवले. त्यापैकीच सर्वोच्च न्यायालय आहे. मात्र सीबीआयला हत्यार बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदिस्त पोपट असे ताशेरे त्यावर ओढले आहेत. ममता बॅनर्जी यांनी कायेदशीर कारवाई केली असताना सीबीआयला वापरून केंद्राच्या सुरू असलेल्या असंवैधानिक कार्याचा निषेधही व्यक्त केला. तर जाणीवपूर्वक राज्य आमचे ऐकत नसल्याचे वातावरण निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले.
सध्या देशाचा पंतप्रधान हा हुकुमशाही चेहरा आहे. देशाला सहजीवन जगणारा, सहपद्धतीत मान्य करणारा चेहरा हवा आहे. त्यासाठीच आम्ही राजकीय भूमिका घेत आहोत. मात्र त्यांनी हिंगोलीचा वंचित आघाडीचा उमेदवार कोण? हे लवकरच सांगू व आघाडीचा निर्णय हा आरएसएसला संविधानिक चौकटीत आणण्याच्या आराखड्यावरच असल्याचे ते म्हणाले. यावेळी एमआयएमचे युसूफ पुंजानी, किशन चव्हाण, फेरोजलाला, जाधव, वसीम देशमुख, रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, अॅड.रवी शिंदे आदींची उपस्थिती होती.