जिल्हा परिषदेत कोणाची होणार आघाडी; अजूनही अनिश्चितताच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:07 PM2020-01-01T20:07:09+5:302020-01-01T20:09:31+5:30
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची सभा २ जानेवारी रोजी
हिंगोली : जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड आता दोन दिवसांवर आली असताना पूर्वीचाच फॉर्म्युला राहणार की नवीन काही बदल होणार यावरून चर्वितचर्वण सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील उपाध्यक्षपदाच्या इच्छुकांतील रस्सीखेचही कायम आहे. प्रत्येकजण मनधरणी करण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची सभा २ जानेवारी रोजी जि.प. सभागृहात होणार आहे. यावेळीही पूर्वीचाच फॉर्म्युला कायम राहिल्यास शिवसेनेकडे एकमेव सदस्य असलेल्या गणाजी बेले यांना अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. तर काही बदल झाल्यास काँग्रेसकडे दोन तर राष्ट्रवादीकडे एकजण यासाठी इच्छुक आहे. रामराव वाघडव, डॉ.सतीश पाचपुते यांची नावेही आधी चर्चेत होती. मात्र आपल्या पदांमध्ये काही बदल होणार नाही, हे गृहित धरून राष्ट्रवादीची मंडळी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत जोर लावताना दिसत आहे. मनीष आखरे, यशोदा दराडे, रत्नमाला चव्हाण, राजेश देशमुख, संजय कावरखे ही नावे चर्चेत आहेत. एकेक नाव कमी होत असून शेवटच्या टप्प्यापर्यंत लढा देणाऱ्यालाच संधीची चिन्हे आहेत. पक्षश्रेष्ठींचेही वजन कोणाच्या पारड्यात पडते, याला महत्त्व आहे.
सभापतीपदासाठी इच्छुक शांत
सभापतीपदी निवडीसाठी १४ जानेवारी २0१९ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे या पदांसाठी इच्छुकांची अजून काहीच हालचाल दिसत नाही. विशेष म्हणजे अजून वाटाघाटींची बैठकच नसल्याने ही बैठक होईपर्यंत आपल्या पक्षाच्या पदरात नेमके काय पडणार आहे, हे कळणारही नाही. त्यामुळेही अनेक इच्छुकांनी तूर्त आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घातल्याचे दिसून येत आहे. मात्र १ जानेवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा रंगत आहे. ही बैठक झाल्यानंतरच यात नेमकी कोणती पदे कोणत्या पक्षाकडे राहतील, याचा मेळ लागणार आहे. त्यात शिवसेनेला अध्यक्षपद कायम ठेवून सभापतीपद बदलून पाहिजे आहे. त्यामुळे आता हे सभापतीपद नेमके कोणते राहील, याची काही श्वासती नाही. या पदावरूनही स्पर्धेतील मंडळी समोर येणार असल्याचे दिसते.
नेतेमंडळी बाहेर, सदस्यांतच चर्चांना ऊत
ज्यांच्या हाती पदासाठी नाव निश्चित करण्याची कमान पक्षाने दिली आहे, अशी नेतेमंडळी जिल्ह्याबाहेरच आहे. सदस्यांना येथून त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरच संपर्क साधावा लागत आहे. विशेष म्हणजे वशिल्यासाठी येणाऱ्या फोनला ही मंडळीही वैतागली आहे.४यावेळी सदस्यसंख्येचा मुद्दा करून काँग्रेसला महिला व बालकल्याण सभापतीपद देत त्यांच्याकडील शिक्षण अथवा समाजकल्याण हे पद पदरात पाडून घेण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. त्याला यश येते की नाही, हे उद्या कळणारच आहे.