हिंगोली : जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ठरावीक तारखेला करण्याचा प्रयत्न होतो. मात्र शिक्षकांना वेतनासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. त्यात नियमित वेतन होत नसल्याने अडचणींत भर पडत आहे. नुकताच मार्च महिन्याचा पगार झाला असला तरी एप्रिल महिन्याचा पगाराची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शिक्षकांचीच पगार उशिरा का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८७९ शाळा असून सुमारे ३ हजार ६१७ प्राथमिक शिक्षक, १७४ माध्यमिक शिक्षक व १९ केंद्र प्रमुख कार्यरत आहेत. त्यात पेन्शनर्स मिळून हा आकडा ५ हजार ६०० च्या घरात जातो. जिल्हा परिषदेतील इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन ठरावीक तारखेला करण्याचा प्रयत्न होतो. मात्र मागील काही महिन्यापासून शिक्षकांचे वेतन ठरावीक तारखेला होत नसल्याचा आरोप होत आहे. काही महिन्यापासून तर पगारच थकीत राहत असल्याचा अनुभव शिक्षकांना येत आहे. वेतनाच्या बळावर अनेक शिक्षकांनी बँकांकडून लाखो रुपयांचे गृह कर्ज घेतलेले आहे. तसेच शिक्षणासाठीही कर्ज उचलल्याचे शिक्षक सांगत आहेत. नियमित वेतन होत नसल्याने बँकेचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत आहे. त्यात बँकेचे हप्ते फेडण्यासाठी सोसायट्यांचे कर्जही काही शिक्षकांनी घेतले आहे. दोन्ही हप्ते भरताना तसेच कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, अपुरे मनुष्यबळ, वेतनाची देयके सादर करण्यासाठी व त्यातील आकडेमोडीसाठी बराच वेळ जातो. त्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल येणे, त्याचे एकत्रिकरण करणे आदीमुळे शिक्षकांच्या पगारी वेळेवर होत नसल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक कारणामुळे वेतन वेळेवर होत नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात येत आहे.
महिन्याच्या शेवटी होतो पगार
शिक्षकांना दर महिन्याला वेतनाचा प्रश्न भेडसावतो. वेळेवर वेतन होत नसल्याने बँकाच्या व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आतापर्यंत दर महिन्याच्या ठरावीक तारखेला वेतन होत नसल्याचा अनुभव शिक्षकांना आहे. मार्च महिन्याचे वेतन मे महिन्यात झाले आहे. आखणी एप्रिल महिन्याचे वेतन होणे बाकी आहे. प्रत्येक महिन्यात पगार करावयाचा झाला तरी अखेरचा आठवड्यापर्यंत वाट पहावी लागत आहे.
आता नियमित वेतनासाठी सीएमपी प्रणाली
शिक्षकांचे वेतन ठरावीक तारखेला व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मनोज पाते, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या पुढाकारातून सीएमपी प्रणाली सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी प्रणालीतून आता दरमहिन्याला वेळेवर वेतन करणे सोयीचे जाणार आहे. मार्च महिन्याचे वेतन याच प्रणालीद्वारे करण्यात आले.
मागील सहा महिन्यापासून शिक्षकांच्या पगारी वेळेत होत नसल्याने उसनवारी करावी लागत आहे. मार्च महिन्याचे वेतन १० मे ला झाले आहे. एप्रिल महिन्याचे वेतन अजूनही मिळाले नाही. तरी शासनाने शिक्षकांच्या पगारी प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला करावी.
-श्रीकांत देशमुख, हिंगोली
वेळेवर पगारी होत नसल्यामुळे घराचे हप्ते, एलआयसी पॉलिसी हप्ते, लाईट बिल, किराणा सामान, दवाखाना आदींचा खर्च भागविणे कठीण होत आहे. त्यामुळे वेळेत पगारी झाल्यास ह्या अडचणी शिक्षकांना येणार नाहीत.
-विलास बेद्रे, कळमनुरी
शिक्षकांच्या पगारी ठरावीक तारखेला होत नाहीत. त्यामुळे बँकाचे कर्ज, मुलांचे शिक्षणाचा खर्च, घर खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. आता सीएमपी प्राणालीद्वारे पगारी होणार आहेत. त्यामुळे पगारी वेळेवर होण्याची अपेक्षा आहे.
- एस.एन. खंदारे, काळकोंडी