हिंगोली: लसीकरणानंतर अँटीबॉडीज तपासणी करण्याची काहीच गरज नाही. शासनाने तशा काही सूचनाही दिलेल्या नाहीत. लसीकरण हा सर्वोत्तम उपाय आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
लसीकरण झाल्यानंतर अँटीबॉडीज तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासणी करून काही जण बिनधास्त बाजारात वावरताना दिसून येत आहेत. खरे पाहिले तर लसीकरणानंतर काही दिवस विश्रांती घेणे गरजेचे आहे. परंतु, काही जण मात्र त्याचा विचारही करत नाहीत. लसीकरण झाल्यानंतरच फिरायला सुरुवात करतात.
जिल्ह्यात एकूण लसीकरण २ लाख ४२ हजार ८४१ एवढे झाले आहे. यात पहिला डोस १ लाख ९९ हजार ६५५ तर दुसरा डोस हा ४३ हजार १८६ एवढा झाला आहे.
जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस १,९९,६६५
दुसरा डोस ४३,१८६
रोज शंभरावर चाचण्या...
लसीकरणानंतर तपासणी करण्याची काही गरज नाही. परंतु, काही खाजगी कार्यालयात रुजू व्हायचे झाल्यास त्यांना तपासणी करण्यासाठी सांगितले जात आहे. तो त्या खासगी कार्यालयाचा प्रश्न आहे. परंतु, तसे पाहिले तर गरज नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
तरुणांची संख्या जास्त...
लसीकरणानंतर अँटीबॉडीज तपासणी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. जे तरुण खासगी कार्यालयात कामाला असतील तर तेथील व्यवस्थापन जे सांगेल त्या प्रमाणे त्यांची सूचना पाळणे गरजेचे आहे. तपासणीबाबत शासनाच्या काही सूचना नाहीत.
प्रतिक्रिया
कोरोन महामारी पळवून लावायची असेल तर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरणानंतर कोणतीही तपासणी करण्याची गरज नाही. शासनाने तपासणी संदर्भात कोणतीही आरोग्य विभागाला सूचना दिलेली नाही.
- डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी