Hingoli Guardian Minister Narhari Zirwal: पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखच पाहायला मिळत असताना हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे सुद्धा यात आता मागे नाहीत. प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिलं अशी खदखद बोलून दाखवली. तसेच मुंबईला गेल्यावर यासंदर्भात जाब विचारणार असल्याचे नरहरी झिरवाळ म्हणाले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री झिरवाळ यांच्या या विधानावर भाष्य केलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंगोलीचे पालकमंत्री हे जिल्ह्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघापासून दूरची पालकमंत्री पदे दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. त्यातच आता कार्यक्रमादरम्यान बोलताना नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीचा गरीब जिल्हा म्हणून उल्लेख केला. तसंच आपल्याला या जिल्ह्याचे पालकमंत्री पद का दिलं असा सवाल वरिष्ठांना विचारणार असल्याचे झिरवाळ म्हणाले. नरहरी झिरवाळ यांच्या या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचा गैरसमज दूर करेल असं म्हटलं आहे.
काय म्हणाले नरहरी झिरवाळ?
"पहिल्यांदाच पालकमंत्री झालो. झालो तर झालो. मला इथं आल्यावर समजलं की, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. सोमवारी आता गेल्यावरती पहिल्यांदा विचारणार आहे तुम्ही गरिबाला गरीब जिल्हा का दिला. मला हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिल्यामुळे मला आनंद झालाय. आम्ही एवढे गरीब आहोत की हा अल्प किंवा जिथे एमआयडीसी नाही अशा राज्यातील जिल्ह्याचे नाव सांगा तर ते होते हिंगोली. आता इथे थोड्याफार प्रमाणात एमआयडीसी यायला सुरूवात झाली आहे. एवढे ऐकल्यानंतर मी सांगितले की बाबा हे अल्प आहे. गरीब आहे. हिंगोली जिल्हा पाण्यापासून वंचित आहे, अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय? असे मी शासनाला विचारणार," असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
झिरवळांशी चर्चा करणार - अजित पवार
"असं काही होणार नाही. मी त्यांना विचारेल. दर मंगळवारी आमची मिटींग असते. अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तो दूर करेल," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.