हिंगोली : घरगुती कारणावरून पत्नीशी भांडण करून धारदार खंजिराने तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या न्यायालयाने ५ मार्च रोजी सुनावली.
२७ मे २०१७ रोजी दुपारी १ च्या सुमारास न.प. कॉलनीत राहणाऱ्या शेख सलीम शेख ईस्माईल वय ६३ याचे पत्नी परवीनबेगम यांच्याशी भांडण झाले. घरगुती वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात शेख सलीम याने पत्नीस धारदार खंजिराने डोक्यावर, गळ्यावर, फासळीवर मारून तिचा निघृण खून केला. याबाबत मयताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. यात फौजदार डी.टी. मुलगीर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्यासमोर हे प्रकरण चालले. यात १८ साक्षीदार तपासले. सरकारी वकील सविता देशमुख यांनी १८ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदाराचा पुरावा व आरोपीचा कबुली जबाब ग्राह्य धरण्यात आला.
यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी शेख सलीम शेख ईस्माईल यास क.३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली. यात सरकारी वकील सविता देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना एस.डी.कुटे, एन.एस.मुटकुळे, जी.व्ही. घुगे यांनी सहकार्य केले.