हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारातून म्हशीसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
गोरेगाव येथील शेतकरी रमेश गंगाराम गवळी (वय ४९) ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वे नं. १८ शेतामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे म्हशीसाठी चारा घेत होते. त्यावेळी एका रानडुकराने अचानक हल्ला केला. शेतकरी रमेश गवळी यांच्या मांडीत रानडुकराचे दात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर रानडुकराने घटना स्थळावरून पळ काढला. गवळी यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या शिंदे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.
वन्यप्राण्याचा उपद्रव वाढला...गोरेगावसह परिसरातील शेतशिवारात रानडुक्कर, नीलगाय, हरणांसह वानरांचा उपद्रव वाढला आहे. वन्यप्राणी शेतातील पिके फस्त करीत असून, यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच काही वेळा हे प्राणी शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांवरही हल्ले करीत आहेत. त्यामुळे या प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. वन विभागाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गजानन पी. कावरखे, नामदेव पतंगे यांनी दिला.