हिंगोली: मराठा समाजाला शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे, ही प्रमुख मागणी पुढे करत वसमत तालुक्यातील गिरगावच्या नऊ तरुणांनी ३१ ऑक्टोबर रोजी ‘बीएसएनएल’ च्या टॉवरवर चढून आपला रोष व्यक्त कला. जवळपास साडेपाच ते सहा तास हे तरुण टॉवरवर थांबले होते.
गिरगाव येथील नऊ तरुण ‘बीएसएनएल’ च्या टॉवररवर चढले आहेत, ही माहिती पोलिस व महसूल विभागाला कळताच दोन्ही विभागांचे अधिकारी व कर्मचारी गिरगाव येथील घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत गावातील ज्येष्ठ मंडळींनी या तरुणांना खाली उतरण्याची विनंती करत होते. परंतु ते तरुण कोणाचीही विनंती मानत नव्हते. टॉवर चढलेले तरुण ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत होते. त्यावेळी खाली उभे असलेले तरुणही घोषणेला प्रतिसाद देत होते. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता हे तरुण टॉवरवर चढले होते.
पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी आल्यानंतर दुपारी २:३० वाजता हे तरुण खाली उतरले. टाॅवरवर चढलेल्या तरुणांना ‘तुमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचविले जाईल’ अशी विनंती केल्यानंतर हे सदरील नऊ तरुण खाली उतरले. टॉवरवर चढणाऱ्यांमध्ये शशीकांत नादरे, शुभम नादरे, वैभव नादरे, मारोती कऱ्हाळे, नरेश कऱ्हाळे, दत्ता भुसागरे, आकाश नादरे, संभाजी खैरे, एस .जी. नादरे यांचा समावेश होता.