औंढा नागनाथ: मी किंवा राजू नवघरे पुढील टप्प्यात कॅबीनेट मंत्री होणार असून विकास कामात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास शिवसेना(शिंदे गट) आ. संतोष बांगर यांनी व्यक्त केला. ते औंढा तालुक्यातील येळी फाटा येथे नागरिकांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
नागरिकांच्या वतीने आ. राजू पाटील नवघरे व आ. संतोष बांगर यांचा आज(30 जानेवारी) रोजी नागरी सत्कार करण्यात आला. आमदार बांगर म्हणाले की, मी व राजू नवघरे जनतेचे आवडते आमदार आहोत. त्यामुळे जनतेच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पुढील टप्प्यात आम्हा दोघांपैकी एकाला नक्की कॅबीनेट मंत्रीपद मिळणार आहे, हा विश्वास मी आज सत्कार समारंभनिमित्ताने देतो. आज जरी आम्ही मंत्री नसलो तरी दोन वर्षात दोन्ही मतदारसंघात सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी पूर्ण ताकदीने शासनाकडे पाठपुरावा करून संपूर्ण जिरायत शेतींना सिंचन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. बांगर यांनी दिले.
तत्पूर्वी आमदार राजू पाटील नवघरे यांनी उपस्थितांना संबोधित करून उखळी व माथा सर्कल अंतर्गत मागणी केलेले सर्व कामे टप्याटप्याने पूर्ण केली जातील त्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी विठ्ठलराव मगर, श्री १०८ मंहत आत्मानंद गिरी, संजय दराडे, राजेंद्र सांगळे, राजाभाऊ मुसळे, कृउबा सभापती शिवाजी भालेराव, अंकुश आहेर, किरण घोंगडे, बाबासाहेब गायकवाड, पांडुरंग नागरे, प्रवीण टोम्पे, गजानन सांगळे, गोपाळ मगर, बबनराव राखोडे, प्रा. दामोदर सांगळे, आदित्य आहेर, दतराव दराडे, आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. दामोदर सांगळे, सूत्रसंचालन संजय दराडे तर राजेंद्र सांगळे यांनी आभार मानले.