हिंगोली : शिवसेनेचे खा. हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम राहणार की नवा पर्याय समोर येणार हे बुधवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्या समर्थकांना दुसरा अहवाल मागविल्याचे सांगून तोपर्यंत शांत राहण्याचा सल्ला दिला.
हिंगोली लोकसभेत भाजपच्या विरोधानंतर खा.हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. यामुळे खा. हेमंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आधी नांदेडात बैठक घेवून तेथील भाजपची जागा पाडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही पाटील यांच्या उमेदवारीवर काहीच निर्णय झाला नसल्याने पाटील समर्थक दोनशे ते तीनशे वाहनांचा ताफा घेवून मंगळवारी मुंबईकडे रवाना झाले होते. मंगळवारी रात्री उशिरा या समर्थकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी अजून रद्द केली नाही.
सर्व्हेक्षणाचा दुसरा अहवाल बुधवारी येणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तर हेमंत पाटील यांच्यावर पक्ष कोणत्याही परिस्थितीत अन्याय होवू देणार नाही, असे सांगत समर्थकांना शांत केले. अडीच वर्षे कोरोनात गेली असताना पुढील अडीच वर्षांत पाटील यांनी केलेल्या कामाचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मात्र उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे आम्ही फेरविचार करीत आहोत. दुसऱ्या अहवालानंतरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. रात्री एक वाजेच्या सुमारास शिंदे यांनी या समर्थकांशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. मात्र ठोस भूमिका न मांडल्याने उमेदवारी ऑक्सिजनवरच आहे. दुसरा अहवालच पाटील यांना वाचवू शकतो, असे चित्र आहे.