गिरगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसा प्रचाराचा वेगही वाढला आहे. यामुळे उमेदवार व पॅनल प्रमुखांनी रात्रंदिवस स्वतःला प्रचार कामात झोकून दिले आहे. प्रचारादरम्यान दिसेल त्यांचे पाय धरत, लक्ष राहु द्या मायबाप अशी भावनिक सादही दिली जात आहे.
वसमत तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्व आहे. सोळा हजार लोकसंख्या असलेली गिरगाव ग्रामपंचायत १७ सदस्यांची असून, सहा प्रभागात विभागलेली आहे. ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सध्या ग्रामपंचायत ताब्यात असलेले पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास कऱ्हाळे हे भाजप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गिरगाव ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर मते मागत आहेत, तर त्यांना तोडीस तोड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवी नादरे हे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नवसंजीवनी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून मतदारांसमाेर जात आहेेत. या दोन्ही पॅनलला टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित नवतरुण विकास पॅनलच्या माध्यमातून दिलीप कऱ्हाळे सज्ज झाले आहेत. वार्ड क्र. एकमध्ये दोन अपक्ष उमेदवारांमुळे रंगत वाढली आहे. अशा प्रकारे १७ जागांसाठी तीन पॅनलचे ४८ व २ अपक्ष मिळून एकूण ५० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचे मतदान आहे. यामुळे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना भावनिक साद घालत आहेत. सकाळ, संध्याकाळ असे दोन फेऱ्या उमेदवार आपल्या प्रभागात न चुकता मारत आहेत. माय, दादा, भाऊ, काका, ताई अशा आदरयुक्त शब्दांचा वापर करून लक्ष राहु द्या मायबाप एकवेळ निवडून द्या, मी तुमचाच असल्याचे प्रचारादरम्यान सांगत आहेत.