हिंगोली : ज्या वाहनाची वयोमर्यादा १५ वर्ष पूर्ण झाली आहे, अशी वाहने चालवायची झाल्यास त्या वाहनांची तपासणी आरटीओ कार्यालयात किंवा फिटनेस सेंटरमध्ये केली जाणार आहे. यासाठी शासन जशी गाईडलाईन देईल त्याप्रमाणे आरटीओ कार्यालयातील अधिकारी काम करतील, असे आरटीओ कार्यालयातून सांगण्यात आले. अजून तरी तशी कोणतीही सूचना शासनाकडून आलेली नाही, असेही कार्यालयाने सांगितले.
जिल्ह्यात आजमितीस नॉन ट्रान्सपोर्ट वाहने ही ३ हजार तर ट्रान्सपोर्ट वाहने ६०० च्या जवळपास आहेत. जी वाहने १५ वर्षांपूर्वीची आहेत अशा वाहनांचा अपघात होण्याची किंवा रस्त्यात बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करून त्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. यासाठी लवकरच शहरात काही मोक्याच्या ठिकाणी फिटनेस सेंटर शासनाकडून उघडले जाणार असल्याचे आरटीओ कार्यालयातून सांगण्यात आले.
गाडी चांगली असल्यासच मिळणार फिटनेस सर्टिफिकेट...
कोणते वाहन रस्त्यावरुन धावू शकेल? कोणते नाही? कोणत्याला परवानगी मिळेल? हे फिटनेस सेंटर ठरविणार आहे. वाहनांची तपासणी केल्यानंतर संबंधित सेंटरमधून फिटनेस सर्टिफिकेट दिले जाईल. त्यानंतर हे प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयात वाहनधारकाला जमा करावे लागणार आहे. यानंतर आरटीओ कार्यालय तपासणी करणार आहे.
३ हजार वाहने धावतात रस्त्यावर
सद्यस्थितीत भंगारातील (१५ वर्षे वयोमर्यादा पूर्ण झालेली) ३ हजार जवळपास वाहने रस्त्यावर धावत आहेत. जास्त जुनी वाहने वाहनचालकांनी रस्त्यावरून चालविणे चुकीचे असून वाहनांची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. कारण जुन्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता असते.
...तर मिळणार ५ टक्के सूट
जुनी वाहने भंगारात दिल्यास त्यासाठी ५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच मोटार वाहन करामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. दुसरीकडे वाहने चालविण्यास योग्य असतील तर त्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तरच ती रस्त्यावर चालविता येणार आहेत.
प्रतिक्रिया...
अजून तरी शासनाची गाईडलाईन आलेली नाही. शासनाच्या गाईडलाईननुसार शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी जुन्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी सेंटरची उभारणी केली जाणार आहे. सेंटरमध्ये किंवा आरटीओ कार्यालयात वाहनांची तपासणी केली जाईल.
- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी