खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. शेतातील विहिरींना भरपूर पाणी असतानाही वीज खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे रब्बी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन, आखाडा बाळापूर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भाजी विक्रेत्यांना ओटे बांधून देण्याची मागणी
हिंगोली: शहरातील भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना ओटे नसल्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विकावी लागत आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. रहदारी जास्त प्रमाणात वाढली की, लगेच भाजी विक्रेत्यांना उठून दुसरीकडे जावे लागते. या बाबीची नगरपरिषदेने दखल घेऊन भाजी विक्रेत्यांना ओटे बांधून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
‘बस स्थानकात पाण्याची व्यवस्था करा’
हिंगोली: शहरातील बस स्थानकात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये जावे लागत आहे. दरम्यान, बस निघून जात आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.