हिंगोली : विना नंबर प्लेट, बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वाहने चालविणाऱ्या ३० वाहनचालकांना वाहतूक शाखेने मंंगळवारी चांगलाच दणका दिला. जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात चालकांनी धाव घेतली होती.
हिंगोली शहरात सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी अचानक वाहनांची तपासणी केली होती. या कारवाईत विना नंबर प्लेट, दुसऱ्या वाहनाची नंबर प्लेट वापरून वाहने चालविणे आदी प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी विना नंबर प्लेट, विना परवाना, सायलेन्सरचा आवाज बदलणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार १३ सप्टेंबरपासून हिंगोली शहरात अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारीही वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली. विना नंबर प्लेट, बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज बदलून वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे अशा चालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर जवळपाास ३० वाहने शहर वाहतूक शाखेत आणण्यात आली होती. या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहने सोडवून घेण्यासाठी चालकांनी शहर वाहतूक शाखेत धाव घेतली होती. ही कारवाई पोलीस हवालदार किरण चव्हाण, बळी शिंदे, गजानन राठोड, वसंत चव्हाण, गजानन सांगळे, सागर जैस्वाल, सुभाष घुगे आदी कर्मचाऱ्यांनी केली.