वसमत (जि. हिंगोली) : येथील महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे सिझर केल्यानंतर तिचे सोमवारी निधन झाल्याने खळबळ उडाली आहे़ मयताच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे़ मेडिकल बोर्डाच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगून वसमत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील महिला गंगासागर दुर्गादास कांबळे (वय २२) ही महिला प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल झाली होती़ सदर महिलेची सिझर शस्त्रक्रिया ८ जून रोजी करण्यात आली़ यात तिला मुलगा झाला़; परंतु प्रसूतीनंतर काही वेळांनी सदर महिलेच्या पोटात त्रास सुरू झाला़ यामुळे डॉक्टरांनी उपचार करून महिलेला इंजेक्शन दिले़ यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला़ हा प्रकार डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे झाला असून, संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी नातेवाईक करत होते़ या प्रकरणाचा मेडिकल अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सांगितले़ सुगंधचंद गायकवाड यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
मृत्यूचे कारण अहवालानंतरच स्पष्ट : डॉ. चव्हाणदरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ वाय़एस़ चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सदर महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया चांगली झाली असून, चार ते पाच तासांनी तिला त्रास सुरू झाला़ त्रास होत असल्याने डॉक्टरांनी महिलेवर उपचार केले़ मात्र, ही दुर्दैवी घटना घडली़ मृत्यूचे कारण अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले़