कळमनुरी : गोरगरीबांचे संसार देशोधडीला लावणारे येथील नवीन बसस्थानकाजवळील देशी दारूचे दुकान तेथून कायमचे हद्दपार करण्याच्या मागणीसाठी महिलांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महिलांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
कळमनुरी शहरात दोन देशी दारूची दुकाने आहेत. एक देशी दारूचे दुकान हे नवीन बसस्थानकाजवळ भरवस्तीत आहे. येथे मुस्लिम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ व बंजारा समाजाचे जगदंबा मंदिर व संत रामचंद्र महाराजांचे मंदिर आहे. या देशी दारू दुकानातील दारुड्यांचा त्रास ये - जा करणाऱ्या शाळकरी मुली व महिलांना नेहमीच होता. तसेच संपूर्ण तालुक्यात खेडोपाडी देशी दारूचे बॉक्स दररोज मोठ्या प्रमाणात येथून विक्री हाेतात. शासनाने नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकान उघडे ठेवून बेकायदेशीर दारू विक्री चालूच असते. शहरातील दोन्ही देशी दारूची दुकान ही एकाच कुटुंबाच्या मालकीचे आहेत. दुसरे देशी दारू दुकानदारही आपल्या हस्तकामार्फत बेकायदेशीरपणे खेडोपाडी देशी दारूचे बॉक्स विक्री करीत आहेत. गोरगरीब, नवयुवक, मजूर आदीचे आयुष्य या देशी दारूमुळे उध्वस्त होत आहे. कळमनूरी शहरातून ही देशी दारूचे दुकान कायमची हद्दपार करावी, अशी मागणी महिलांच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली आहे. जोपर्यंत शहरातील देशी दारूचे दुकान येथून कायमचे हद्दपार होत नाही, तोपर्यंत लढा कायम ठेवणार असल्याचे महिलांनी सांगितले.
महिलांच मोर्चा नवीन बसस्थानक येथून हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. यादरम्यान महिलेच्या हातात देशी दारू शहरातून हद्दपार करण्या करिताचे व देशी दारू बंद करण्याबाबत विविध घोषणाचे फलकही मोर्चेकरी महिलांच्या हातात दिसून आले. महिला मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते यांना दिले. शहरातील दारूचे दुकान हटवाण्यासाठी महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. या निवेदनावर अजीज पठाण, श्वेता जुने, उषा सोनूने, प्रिया चौधरी, दुर्गा चौधरी, वनिता चाैधरी, सुनीता वाढणकर, वंदना चौधरी, मीरा चौधरी, पूजा स्वामी, मालुबाई लिंबाळकर, वनिता पत्रे, सारिका जुने, कमलबाई चौधरी, सुमनबाई गडदे, शीला अलदुर्गे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.