हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. दरम्यान, गिरगाव येथील गावकऱ्यांनी व महिलांनी मुलाबाळांसह ७० ट्रॅक्टरद्वारे मोर्चा काढून वसमत तहसील गाठले. यानंतर वसमत येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मागच्या तीन दिवसांपासून गिरगाव येथे प्रमोद नादरे, पांडुरंग नादरे, शशिकांत नादरे, गोविंद कऱ्हाळे, नरेश कऱ्हाळे, राहुल कऱ्हाळे, शैलेश वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आतापर्यंत कित्येक सरकारने येवून गेली. परंतु अजूनही मराठा समाजबांधवांचा कोणी प्रश्न सोडविला नाही. दरवर्षी निवडणुका आल्या की नुसते आश्वासन दिले जात आहे. परंतु ठोस पाऊले घेऊन त्यावर कोणी निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींना शासनाच्या कोणत्याच सवलती मिळत नाहीत. आरक्षण नसल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. प्रत्येक वेळी लवकर आरक्षण दिले जाईल, काळजी करण्याचे कारण नाही, असे लोकप्रतिनिधी व शासनकर्ते सांगत आले आहेत, असे मोर्चेकरी महिलांनी सांगितले.
गिरगाव येथून काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चात गिरगावसह परजना, मुरुंबा आदी गावांतील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. वसमत येथे महिलांचा मोर्चा पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपोषणकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार शारदा दळवी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.