लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २0१८-१९ च्या आराखड्यात तब्बल ११५ गावांची निवड केली आहे. तर यापैकी २२ गावांतच आराखड्याची ५0 टक्क्यांपेक्षा जास्त अंमलबजावणी झाली आहे. उर्वरित ९0 पेक्षा जास्त गावे अजूनही त्यापेक्षा कमीच कामे झालेली आहेत.या योजनेत यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे थोडीबहुत सुधारणा दिसत असली तरीही हे वर्ष निवडणुकांचे असल्याने यात मोठ्या अडचणी येणार असल्याचे लक्षात घेता कामांना गती देणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजना याच शासनाच्या काळात सर्वच गावांपर्यंत पोहोचण्यासाठी यंदा निवडण्यात आलेल्या गावांची संख्या तब्बल ११५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने निवडलेल्या गावांत कामे करण्याची कवायत विविध यंत्रणांना करावी लागणार आहे. केवळ २२ गावांत ८0 टक्के कामे झाली आहेत. यात हिंगोली, वसम व कळमनुरी प्रत्येकी ३ तर सेनगाव ४ व औंढ्यातील ९ गावांचा समावेश आहे. ५0 टक्के कामे झालेल्यांत हिंगोली १२, कळमनुरी २, सेनगाव ११, वसमत १0, औंढा ८ अशी संख्या आहे. ३0 टक्के कामे झालेल्यांत हिंगोली १४, कळमनुरी ५, सेनगाव ५, वसमत १0 तर औंढ्यातील ४ गावांचा समावेश आहे.यामध्ये सर्वांत कमी गावे कळमनुरी तालुक्यात असताना याच तालुक्यात कामांची गतीही सर्वांत धिमी असल्याचे दिसत आहे. तर औंढा तालुक्यात गावांच्या संख्येच्या तुलनेत चांगले काम आहे. त्यापाठोपाठ हिंगोलीचे काम चांगले दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात आराखड्यानुसार ४८.४६ कोटींची २४१२ कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र प्रत्यज्ञात २६.५३ कोटींच्या १८५२ कामांना कार्यारंभ आदेश दिला. यातील १0९९ कामे पूर्ण झाली असून २.६४ कोटी खर्च झाला. तर ३७७ कामे सुरू असून त्यावर ७.२२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यावरून कमी खर्चाची कामे तेवढीच पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातही नाला सरळीकरणाच्या कामांवरच जोर असून सर्व यंत्रणा ही कामे जास्त करीत आहेत. यामध्ये कंत्राटदारांनाही मार्जिन असल्याचे चित्र आहे.
२२ गावांतच जलयुक्तची ५0 टक्क्यांवर कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:16 AM