हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या विहिरी, शेततळ्यांबद्दल बोलतात, ते गुप्त आहेत. फक्त पुण्यवान लोकांनाच दिसतात. ३३ कोटी वृक्ष लागवाडीतील झाडेही पुण्यवानांनाच दिसतात. सरकारचे असे अनेक प्रकार आहेत जे पुण्यवानांनाच दिसतात. जर याबद्दल कोणी बोलले की, त्याला ईडीची नोटीस दिली जाते, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकावर टीका केली.
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील सभेत ते बोलत होते. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने ही सभा झाली. सायंकाळी सहाच्या सभेला रात्री ८ वाजता प्रारंभ झाला. त्यामुळे जनतेला ताटकळावे लागले. तरीही गर्दी कायम होती. यावेळी अजित पवार म्हणाले, आघाडी शासनाने ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. या सरकारने रंग बदलू-बदलू केवळ याद्या काढल्या. शेतकऱ्यांना लाभ दिला नाही. त्यामुळे १६ हजार शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळले. आता परिवर्तनाची संधी आहे. आमचं सरकार निवडून द्या, चार महिन्यांत सरसकट कर्जमाफी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. सभेसाठी खा. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, आ.रामराव वडकुते, शेख मेहबूब, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, मुनीर पटेल, बाबाराव खडसे आदींची उपस्थिती होती.
ज्या ताकतोडा गावाने गाव विक्रीला काढलं तेथे प्रशासनाशिवाय सरकारचा कुठलाही प्रतिनिधी फिरकला नाही, आरोप खा.अमोल कोल्हे यांनी यावेळी केला.