हिंगोली : तालुक्यातील कलगाव ते भांडेगाव हा पांदण रस्ता क्रमांक मिळूनही राजकीय दबावातून त्याचे काम केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. जर हे काम करता येत नसेल तर या ठिकाणी हेलिकॉप्टरची व्यवस्था करून शेतकरी व विद्यार्थ्यांची सोय करण्याची अफलातून मागणी शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, कलगाव ते भांडेगाव हा तीन ते चार किलोमीटरचा पांदण रस्ता आहे. या रस्त्याला क्रमांकही मिळाला आहे. या कामाला मंजुरीही मिळाली आहे. शिवाय ९० टक्के शेतकऱ्यांनी हे काम करण्यासाठी संमतीही दिली आहे. मात्र राजकीय दबावातून हे काम बंद पाडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असताना अनेकांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. याच मार्गावरून कलगाव गावातील आठवी ते बारावीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीही ये जा करतात. त्यांनाही या रस्त्यामुळे अडचण होत आहे. तसेच नागरिकांना आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्यातही याच मार्गाने यावे लागते. मात्र हा रस्ताच नसल्याने नागरिकांनी कुठून ये-जा करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा रस्ता करता येत नसेल तर शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करून देण्याची मागणी अनिल पौळ, भाऊराव पौळ, शिवराम वाघमारे, उत्तम घुमनर, विश्वकांत वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, भुजंग मस्के, गंगाराम वाघमारे आदी शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे हेही उपस्थित होते.