हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक सक्रिय झाले आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांवर ही मंडळी झडगताना दिसू लागली आहे. काहीजण तर पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहे. मात्र सर्वच पक्षांमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून कोणाचे तिकिट कापणार आणि कुणाला मिळणार? यावर खल होताना दिसत आहे.
शिवसेना व भाजपचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंडळींनी कंबर कसली आहे. कुणी उघड तर कुणी आतून संधान बांधून विजयाची गणिते आखत आहे. या निवडणुकीत भाजपची धुसपूस आता चव्हाट्यावर येण्याच्या मार्गावर आहे. हिंगोलीत काही भाजपची मंडळी वेगळी चूल मांडायची तयारी करीत आहे. आमदार व नगराध्यक्षांमध्येही बेबनावाचे वारे वाहू लागले आहे. आतापर्यंत काँग्रेसलाच असलेली ही लागण भाजपमध्ये चांगलीच फोफावली आहे. शिवाय उजव्या व डाव्यांच्या खेळात उजव्यांना एका छत्राखाली आणण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कळमनुरीतही माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख, वसंतराव देशमुख, पी.आर. देशमुख अशी लांबलचक यादी आहे.
एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा नाराज होणार असाच एकंदर प्रकार आहे. वसमतला मात्र एकमेव अॅड.शिवाजी जाधव हेच दावेदार आहेत. मात्र त्यांना सेनेची उमेदवारी मिळणार असल्याची मध्येच हूल उठत आहे. कळमनुरीतही अशाच प्रकारे अॅड. शिवाजी माने यांचे नाव सेनेकडून चर्चेत येत आहे. विद्यमान खा.हेमंत पाटील यांनी अजूनही खऱ्या अर्थाने हिंगोलीला आपलेसे केले नसले तरीही त्यांच्याच नावावर या बाबी पसरत आहेत. या अफवा की सत्यता हे आगामी काळातच कळणार आहे. मात्र यामुळे शिवसेनेचे वसमतचे आ.जयप्रकाश मुंदडा व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. काहीजण तर आता सेनेला आमदारकीलाही बाहेरूनच उमेदवार आणले तर निवडून येतील, असा उपहासात्मक टोला मारत आहेत.
वसमतला सेनेतील इतर काहींच्या आकांक्षांनाही धुमारे फुटले आहेत. ते आ.मुंदडा यांचे कार्यकर्ते म्हणून राहण्यापेक्षा रिंगणात उतरायची तयारी करीत आहेत. मात्र तिकिट सेनेचेच पाहिजे, अशी मानसिकता दिसत आहे. कळमनुरीत संतोष बांगर यांच्यानंतर केवळ गोपू पाटील सावंत यांनीच दावेदारी केली आहे. हिंगोलीत सेनेच्या रुपाली पाटील गोरेगावकर व रामेश्वर शिंदे या दोघांची नावे चर्चेत आली आहेत. यावेळी शिवसेनेलाही वेगळे लढण्याची आस असून तसे न झाल्यास बंडखोरीचा मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता वाढली आहे. अनेक कार्यकर्तेही ही भाषा बोलत असून भाजपला जागा दाखवायची खुमखुमी जागी झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेसला हिंगोलीत इच्छुकांचा उत आला आहे. सतत पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या व मागच्या वेळी पराभूत भाऊराव पाटील यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शिवाय ज्याला काँग्रेसची उमेदवारी मिळाली त्याचे काम इतर करतीलच, असे काही दिसत नाही. कळमनुरीत काँग्रेसने आ.संतोष टारफे यांना कामाला लागण्याचा आदेश दिला. मात्र वेगवेगळ्या दिशेला तोंडे असलेल्या कार्यकर्त्यांना एका दिशेने नेण्याची कवायत त्यांना करावी लागणार आहे. वसमतमध्ये डॉ.एम.आर.क्यातमवार यांच्या रुपाने नवा चेहरा काँग्रेसकडून चर्चेत आला आहे.
राष्ट्रवादीही जिल्ह्यातील सर्वच जागांची तयारी करीत आहे. हिंगोलीत आ.रामराव वडकुते, कळमनुरीत दिलीप चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. वसमतला मात्र माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राजू पाटील नवघरे ही दोन नावे चर्चेत आहेत. येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतील हेवेदावे पराकोटीचे असून अजूनही कायम असल्याचे दिसत आहेत. काहींनी तर आधीच पक्षही सोडला आहे. कळमनुरीत तर राकाँला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. हिंगोलीत मागच्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राकाँला यावेळी विजयाची गणिते जुळवायची तर आधी शहरी व ग्रामीण कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करावी लागणार आहे. काहीजण रोजच पक्षांतराची ढोस देत आहेत.
वंचितला चांगल्या चेहऱ्यांचा शोधहिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने चांगली मते मिळविली ते विधानसभा मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे वंचितनेही लक्ष केंद्रित केले आहे. चांगल्या चेहऱ्यांचा शोध भारिप व एमआयएमकडून घेतला जात आहे.४ अजित मगर, फैजल पटेल, गोविंद भवर अशा अनेक दिग्गजांनी विविध विधानसभांसाठी वंचितकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे वंचितच्या उमेदवारांकडेही लक्ष लागले आहे. सामाजिक गणिते लावून उमेदवारी देणार की कसे? हे अजून गुलदस्त्यात आहे.