हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान वाटप करण्यात येणार आहे. ही मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २० टक्के बालकांमध्ये जंतदोष असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळेच्या प्रांगणात नेमणूक केलेल्या शिक्षकांकडे या गोळ्यांचे वाटप मोहिमेदरम्यान केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आशावर्कर, आरोग्य सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू आहे. याबाबत शासनाने तसे निर्देश दिल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. ज्या पालकांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत त्यांनी, आशावर्कर, आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सर्वांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत.
- काय आहे जंतदोष...
बालक जर गोड पदार्थ मागत असेल तर त्याच्या पोटात जंत आहेत हे समजावे. पालकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जंतनाशक गोळी बारीक करून पाण्यात टाकून चमच्याने ते पाणी पाजावे.
- वयाच्या १९ वर्षांपर्यत द्याव्या लागतात गोळ्या...
वय वर्ष एकच्याखाली ही जंतनाशक गोळी बालकाला देऊ नये. १ ते १९ वर्षांपर्यत ही जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
- गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा...
शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी जंतनाशक गोळ्यांसाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. बालकांना जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक़्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्यावे.
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप...
जंतनाशक गोळ्यांचे वाटप हे आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. तेव्हा नागरिकांनी जंतनाशक गोळ्याबाबत आरोग्य विभाग किंवा आशा वर्कर यांच्याकडे विचारणा करावी. एक वर्षाखालील मुलांना ही जंतनाशक गोळी देऊ नये.
बालकांची काळजी घ्यावी...
बालकांच्या पोटात जंत असल्यास बालकांना खूप त्रास होतो. बालक रडू लागते. बालक सतत गोड पदार्थ मागत असतो. अशावेळी त्यास गोड पदार्थ न देता जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी. बालकास बाहेरचे पदार्थ देण्याचे टाळावे. एक ते दोन वर्ष बालकास अर्धी गोळी द्यावी.
- डॉ. नामदेव कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी