लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यांसाठी २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.शेतकºयांना सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग हळद या प्रमुख पिकांसाठी आधुनिक व अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, विविध शासकीय योजना, अभियान, उपक्रमांची माहिती व त्याचा लाभ घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकºयांत जनजागृती करणे, बीजप्रक्रियेबाबत शेतकºयांमध्ये जागरुकता निर्माण करणे, पीकविमा योजनेत जास्तीत-जास्त शेतकºयांना सहभागी होण्यास जागरुकता निर्माण करणे, कापसावरील शेंदरी बोंडअळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. आंतरपीक पद्धतीसह बहुवार पीक पद्धतीचीही माहिती दिली जाणार आहे. कृषीपूरक व्यवसायात पशुपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, रेशीम उद्योग आदींच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितले जाणार आहे.प्रगतीशिल शेतकºयांनी चांगले उत्पादन घेण्यासाठी अवलंबलेले नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान इतर शेतकºयांपर्यंत मोहोचविणे, एम.किसान पोर्टलच्या मोफत एसएमएस सुविधेचा लाभ देणे, गट/ समुहांच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन साखळी निर्माण करण्याबाबतही जागृती करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी किटकनाशके फवारताना अनेक शेतकºयांना मृत्यूने गाठले. त्यामुळे शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, किती प्रमाणात तीव्र औषधांचा वापर करावा, अशी औषधी हाताळताना घ्यावयाची काळजी व आपत्तीतील काळजीचेही मार्गदर्शन करण्यात येईल. कृषी निविष्ठा खरेदीबाबतही माहिती दिली जाणार आहे. या पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी केले.उन्नत शेती, समृद्ध अभियानाच्या निमित्ताने शेतकºयांना जागेवर मार्गदर्शन करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. मात्र खालच्या यंत्रणेनेही त्यासाठी तेवढीच जागरुकता दाखविणे गरजेचे आहे. अनेकदा या यंत्रणेची उदासीनता शेतकºयांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यात अडसर ठरते. पिकांची उत्पादकता, अनुवंशिक उत्पादनक्षमता आणि सध्या करावयाच्या उत्पादनवाढीचा लक्षांक याबाबत प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकºयास योग्य मार्गदर्शन मिळाले तरच त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे काहीजणच ही योजना राबवतील व इतर मोकळेच राहतील.
यंदाही उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:06 AM