लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले आहे. नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार वाटपाच्या सूचना आहेत. मात्र सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही, त्यामुळे दरवर्षी ५ सप्टेंबरच्यानंतरच पुरस्कार वितरीत केले जातात. शिक्षण विभागाकडे एकूण १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती आहे.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. हिंगोली जिल्ह्यातील तालुका स्तरावरून संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हा कार्यालयात एकूण १२ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. निवड समितीमार्फत सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार होते. आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन आहे. मात्र समितीची अद्याप बैठकच झाली नाही. त्यामुळे प्रस्तावही पाठविण्यात आले नाहीत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची निवड केली जाते. परंतु हे प्रस्ताव अद्याप शिक्षण विभागाकडेच पडून आहेत.याबाबत प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल आहेत. येत्या १७ सप्टेंबरपर्यंत निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार वाटप केले जातील, असे त्यांनी सांगितले.आदर्श पिढी घडविणाºया शिक्षकांचा शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शिवाय शासनाच्या तशा सूचनाही आहेत. परंतु वेळेत कामे केली जात नाहीत, त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा पुढच्या कोणत्या तरी तारखेत साजरा केला जातो.जि. प. शिक्षण विभागातील विविध कामे व योजनांची कामे संथगतिने सुरू आहेत. त्यातच शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के प्रशिक्षणासाठी दीर्घ कालावधीच्या रजेवर आहेत. त्यामुळे डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे.आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अद्याप जि. प. च्या समितीची बैठकच झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे नियोजनाअभावी यावर्षीही सोहळ्याची गतवर्षी सारखीच बोंब होणार, हे निश्चित आहे.
यावर्षीही पुरस्कार वितरण लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:20 AM