लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.हिंगोली जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये शासनाकडून अधिकृत दुष्काळ घोषित झाला. हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्याचा यात समावेश आहे. वसमत व औंढा तालुक्यातही त्याची तीव्रता तेवढीच असताना वसमत तालुक्यातील केवळ दोन मंडळांमध्ये दुष्काळ घोषित झाला. मात्र त्यांच्या मदतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याच दोन तालुक्यांना लागून असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातील जलसाठाही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. येलदरी धरणाचे पाणी सोडल्याने हे धरण आताच जोत्याखाली गेले आहे. मृतसाठ्यात १0६ दलघमी पाणी आहे. तर सिद्धेश्वर धरणात २१.९0 टक्के पाणी असले तरीही जिवंतसाठा केवळ १७.७३ दलघमीच आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार असल्याचे दिसत आहे. आणखी तीन ते चार महिने याच पाण्यावर काढावे लागणार आहेत.हिंगोली तालुक्यातील हिरडी, हातगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, पूर्णा तालुक्यातील मरसूळ हे तलाव मात्र जोत्याखाली गेले आहेत.एक कोल्हापुरी बंधारा आटलाचारपैकी हिंगोली तालुक्यातील खेर्डा कोल्हापुरी बंधारा आटला आहे. तर सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १00 टक्के भरलेले आहेत. परभणी तालुक्यातील राहाटी बंधारा ५६ टक्के भरलेला आहे.मोठ्या दोन धरणांचे हे चित्र असताना २६ लघुप्रकल्पांतील जलसाठाही आटत चालला आहे. सहा प्रकल्प तर जोत्याखाली गेले आहेत. १६ प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत गेला आहे. तर ४ प्रकल्पच ५0 टक्क्यांपर्यंत भरलेले आहेत. हिंगोली तालुक्यातील पारोळा-१६ टक्के, वडद-१२ टक्के, चोरजवळा-१७ टक्के, सवड-६ टक्के, पेडगाव-१२ टक्के, सेनगाव तालुक्यातील सवना-१७ टक्के, पिंपरी-९ टक्के, घोडदरी- ८ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी-१८ टक्के, सुरेगाव-१७ टक्के, औंढा-५0 टक्के, पुरजळ १२ टक्के, वंजारवाडी-१४ टक्के, पिंपळदरी-३९ टक्के, काकडदाबा-१८ टक्के, केळी १३ टक्के, कळमनुरी तालुक्यात बोथी-२९ टक्के, कळमनुरी-१८ टक्के, दांडेगाव-२५ टक्के, देवधरी-२१ टक्के, वसमत तालुक्यातील राजदरी ४३ टक्के असा जलसाठा आहे.
येलदरी जोत्याखाली;सिद्धेश्वर २१ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:52 AM