- अंबादास फेदराम (आंबा चोंडी, जि. हिंगोली)
अल्पभूधारक शेतकरी रावसाहेब शंकरराव भोसले यांनी १० गुंठ्यात मिरची लागवडीतून १ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता अखेरच्या तोडणीत दीड ते दोन लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे. आंबा चोंडी येथील शेतकरी रावसाहेब भोसले यांना एकूण ३ एकर जमीन आहे. त्यामध्ये ते सोयाबीन, हळद, कपासी, तूर ही पारंपरिक पिके घेत आले. पाच वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुल्तानी संकटाने प्रचंड तोटा सहन करावा लागला. यातून उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने त्यांनी मिरची लागवड करायचे ठरवले.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी अंकुर ९३० या वाणाचे बियाणे आणून वाफा पद्धतीने मिरचीची रोपे तयार केली. उन्हापासून संरक्षणासाठी साड्यांची सावली केली. वाफ्यांना झरीने पाणी दिले. मृग नक्षत्रात ५ बाय दोन फुटावर लागवड केली. लागवडीनंतर १०:२६:२६ व युरिया खताचे चार डोस केले. तीन ते चार वेळा ट्रेसर या नैसर्गिक कीटकनाशकाची फवारणी केली. आॅगस्ट महिन्यापासून मिरची तोडणी सुरू झाली. सप्टेंबर महिन्यापासून दहा दिवसाला ५ ते ६ क्विंटल मिरची निघत आहे.
जिल्ह्याबाहेर वाहतुकीसाठी जास्त खर्च होत असल्याने ते वसमत, शिरडशहापूर, कुरुंदा व आंबा चोंढीच्या बाजारात कधी स्वत:, तर कधी ठोक व्यापाऱ्यांना मिरची विक्री करतात. कधी जास्त मिरची निघाली, तर हिंगोलीच्या व्यापाऱ्यांना ठोक विक्री करतात. मिरचीचा रंग आकर्षक असल्याने त्यांना सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. सर्व खर्च वजा जाता आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळाले आहे. शेवटच्या तोडणीअखेर दीड ते दोन लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन, कापूस या पिकांतून उत्पादन खर्चही निघाला नाही. पीक पद्धतीत बदल केला नसता, तर प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलो असतो, असेही भोसले यांनी सांगितले. १९९४ मध्ये रावसाहेब भोसले यांनी परभणी कृषी विद्यापीठात कृषी पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी खाजगी बियाणे कंपनीमध्ये काही दिवस नोकरी केली. नोकरीदरम्यान अनेक शेतावर भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने सर्वच पिकांची परिपूर्ण माहिती मिळत गेली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वत:ची शेती करण्याचा निर्णय घेतला.
भोसले हे शेतीत दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत गेले. त्या प्रयोगातून भरपूर अनुभव आला. कुठल्या पिकाला कोणती खते, कोणत्या वेळी कोणती सूक्ष्म पोषकद्रव्यांची गरज असते याची माहिती असल्याने उत्पादनातही भरपूर वाढ झाली. आंबा चोंडी परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीत सहामाही पिकेच घेता येतात. सहामाही पिकांमध्ये मिरची हे पीक फायदेशीर असल्याने या पिकाची निवड केली. सिंचनासाठी विहिरीची व्यवस्था आहे. मिरची पिकाची ठिबकवर लागवड केल्याने पाण्याची भरपूर बचत होते. शिवाय जास्त कष्ट घेण्याची गरज नसते.