- इस्माईल जहागिरदार वसमत (जि. हिंगोली): इराणमध्ये बेपत्ता झालेला वसमतचा योगेश पांचाळ सुखरुप मायदेशी ५ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता परतला. बुधवारी मुंबई विमानतळावर योगेशला पाहताच कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. इराण मधील तेहरान येथे कंपनीच्या कामासाठी गेला होता. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी भारत सरकारचे तसेच लोकप्रतिनिधींचे आभारही मानले.
वसमतचा अभियंता योगेश पांचाळ यांनी श्रीयोग एक्सपोर्ट नावाच्या कंपनीची नोंदणी केली होती. या कंपनीच्या विस्तारासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई येथील काही जणांसोबत संपर्कही साधला होता. त्यानंतर त्यांना अशाच प्रकारची कंपनी इराण देशातील तेहरान येथे असून त्या ठिकाणी पाहणी करून येण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार ५ डिसेंबर २०२४ रोजी योगेश तेहरान येथे पोहोचले होते. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यानंतर ७ डिसेंबर पासून त्यांचा अचानक संपर्क तुटला. यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत होते.
त्यांच्या कुटुंबियांनी दिल्ली येथील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली होती. या शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, आमदार राजु नवघरे यांना माहिती दिली होती. तर आमदार नवघरे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून केंद्र शासनाने त्याला भारतात परत आणण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.दरम्यान, त्यानंतर शासनाने त्यांचा तेहरान दुतावासाशी संपर्क साधून माहिती घेण्यास सुरवात केली होती. यामध्ये योगेश यांना तेहरान येथे चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबियांनी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी दिल्ली येथील दुतावासाशी संपर्क साधला होता. त्यांची पत्नी श्रध्दा पांचाळ, भाऊ मंगेश पांचाळ, मेहूणे ॲड. सचिन जोशी यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर योगेश हे सुखरुप असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान, योगेश यांना तेहरान येथून मंगळवारी रात्री साडेदहा वाजता विमानात बसवून देण्यात आले असून ते आज सकाळी मुंबई येथे येणार असल्याचे दुतावासाच्या वतीने कळविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने मुंबई येथे जाऊन आज सकाळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यांना पाहताच कुटुंबियांना अश्रू आनावर झाले होते. यावेळी त्यांच्या कुटुबियांनी शासनाचे तसेच मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींची आभार मानले.
तेहरान पोलिसांनी केली दोन वेळा चौकशी....तेहरान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा चौकशी केली. पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे कुटुंबियांशी संपर्क साधता आला नाही. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी सन्मानाचीच वागणूक दिल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगितले.
आ नवघरे यांचे प्रयत्न फळाला...अभियंता योगेश पांचाळ इराण देशातील तेहरान येथे कामानिमित्त गेला व तो बेपत्ता झाला ही माहिती आ राजु नवघरे यांना मिळताच त्यांनी पांचाळ कुटुंबीयांची भेट घेतली, अधिवेशनात योगेच्या शोधासाठी प्रश्न उपस्थित केला,त्या नंतर वारंवार त्याच्या साठी पाठपुरावा केला, आमदार नवघरे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर फळ मिळाले व योगेश चा शोध लागला,५ फेब्रुवारी रोजी तो मायदेशी परतला आहे.
कुटुंबामध्ये आनंदी आनंद...योगेश पांचाळ मुंबई येथे आल्याची माहिती कळताच 'लोकमत' ने योगेश पांचाळे यांचा भाऊ मंगेश पांचाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस त्यांनी भारत सरकार व इराण सरकारचे आभार मानले. माझा भाऊ सुखरूपपणे भारतात येण्यासाठी भारत सरकारने आटोकाट प्रयत्न केले. भारत सरकारच्या प्रयत्नाला यश आले. माझ्या भावाला कोणत्याही प्रकारचा त्रास इराण सरकारने दिला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रयत्नांना यश मिळाले! इराणमध्ये बेपत्ता झालेले वसमत, जि. हिंगोली येथील उद्योजक अभियंते योगेश पांचाळ अखेर आज पहाटे सुखरुप मुंबईत परतले. त्यांच्या शोधासाठी कुटुंबियांनी केलेल्या अथक प्रयत्नांची व प्रार्थनेची ही फलश्रुती आहे. पांचाळ परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच भारत सरकार, भारताचे तेहरानमधील दूतावास आणि नवी दिल्ली व मुंबईतील इराणी दूतावासाचे आभार. योगेश पांचाळ यांच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, याचा अतिशय आनंद आहे.- खा. अशोक चव्हाण