लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तरूणाईने पुढाकार घेतला पाहिजे. राजकारण वाईट आहे, असे सातत्याने तरूणाईवर बिंबवले जाते. परंतु राजकारणाशिवाय विकासाची संकल्पना कोसोदूर असल्याने प्रस्थापित राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका करत महाराष्ट्राच्या नवनिमार्णासाठी युवकांनी पुढाकार घेतला घेण्याचे आवाहन ५ जानेवारी रोजी जिजाऊ व्याख्यानमालेतून कवी व लेखक ज्ञानेश वाकोडकर यांनी केले.हिंगोली येथील अॅड. ग्यानबाराव सिरसाट विचारमंच महावीर भवन येथे ५ जानेवारी रोजी जिजाऊ व्याख्यानमालेचे शेवटचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उद्घाटक सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, तसेच जिल्हाध्यक्ष सतीश जाधव पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, खंडेराव सरनाईक आदी उपस्थित होते. युवा महाराष्ट्र नवा महाराष्ट्र या विषयावर बोलताना ज्ञानेश वाकोडकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली लोकशाही राज्य आले पाहिजे. लोकशाही प्रधान देशात शेतकरी आत्महत्या, रोजगारांचे प्रश्न, गरीब-श्रीमंतांची दरी अशा अनेक बाबींवर वाकुडकर यांनी कवीतेून प्रहार केला.कविता सादर करत ते म्हणालेमी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त तर काही स्वप्न महाग लावणार आहे. झोपडीतल्या देवाची शपथ, महालातल्या देवांना मी आग लावणार आहे.या प्रकारे त्यांनी कविता सादर करून प्रबोधन केले.अंधश्रद्धेविषयी बोलताना ते म्हणाले प्रत्येकांनीच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. पंचाग पाहणारे ज्योतिष्य पोपटाच्या भरवशावर तुमचे भविष्य सांगतात. तरी सुद्धा तुम्ही विश्वास ठेवता, हे चुकीचे आहे. धर्माला दोष देऊन फायदा नाही. सर्वांनी चिकित्सक बुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. विशेषत: यासाठी तरूणाईने पुढाकार घेतला पाहिजे. एकीकडे राजकारणी लोकांना बदमाश म्हणायचे आणि त्यांनाच मतदान करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुळात राजकारण वाईट नसतं. फक्त त्या माध्यमातून वाईट कामे केली जातात. असे मत वाकोडकरांनी व्यक्त केले.संचालन पंडित अवचार, गोपाल इंगळे, जिजाऊ वंदना डॉ. ऋतुजा वायचाळ, प्रास्ताविक सतीश पाटील, पडोळे यांनी केले. आभार पंडित सिरसाट यांनी मानले.शासन दरबारी हिंगोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणून आहे. मानव विकास निर्देशांकही कमी आहे. मला हिंगोलीचे नागरिक आवडतात. ते छोट्या गोष्टीतही समाधानी राहतात. परंतु सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे. प्रशासन दुष्काळ, पाणीटंचाई अशा सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. मागासलेला जिल्हा ही ओळख आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिटविता येईल, असे त्यांनी सांगितले. जिजाऊ व्याख्यानमालेविषयी बोलताना ते म्हणाले मराठा सेवा संघाच्या वतीने मागील १९ वर्षांपासून स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे असेही ते यावेळी म्हणाले.
युवकांनी पुढाकार घ्यावा- वाकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:10 AM