वाकोडी ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील जिल्हा परिषद शाळेस आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कार्यालयातील संगणक, कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य जळून जवळपास दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती सरपंच सुलोचनाबाई नाईक यांनी दिली.
वाकोडी येथे जिल्हा परिषदेची पाचवी ते दहावीपर्यत शाळा आहे. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य कार्यालयास आग लागली. ही माहिती शाळच्या परिसरात खेळत असलेल्या मुलांनी ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यात पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विठ्ठल कदम यांनी कळमनुरी येथील अग्नीशमन कार्यालयाला दूरध्वनी केला. अर्ध्या तासामध्ये कळमनुरी येथील अग्नीशमन वाकोडी येथे दाखल झाले.
अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य कार्यालयाला लागलेली आग आटोक्यात आणली. परंतु, अग्नीशमन गाडी येईपर्यत कार्यालयातील शैक्षणिक साहित्य, संगणक, कपाट, इतर बाहेर ठेवलेले रेकॉर्ड जळून खाक झाले. सायंकाळी पावणेसहा वाजता आग पूर्णत: आटोक्यात आली. या आगीत दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गावकऱ्यांनी शाळेचे शिक्षक पारसकर यांना शाळेला आग लागल्याची माहिती दिली. परंतु, मी बाहेर असल्याचे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. तर मुख्याध्यापकांचा फोन लागला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष विश्वनाथ काकडे, ग्रा. पं. सदस्य बबन गायकवाड, विकास जाधव, किरण काकडे, मारोती जाधव, किरण राऊत, विठ्ठल कदम व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.