जिल्ह्यात २४ प्राथमिक तर ११९ आरोग्य उपकेंद्रे आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व बायपॅप मशीन उपलब्ध करून दिली. तर कवठा व सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध केले. या ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार झाले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने डोंगरकडा येथे ५० खाटा, शिरड शहापूर येथे ३५ खाटा तर जवळा बाजार येथे ५० खाटांचे नियोजन केले असून ऑक्सिजनची सुविधाही राहणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक डीसीएचसी ऑक्सिजन बेडसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११९ आरोग्य उपकेंद्रांतही ऑक्सिजन सुविधेसह खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन चालू झाले आहे. तर आवश्यकतेनुसार मागणीचे प्रस्ताव सादर करण्यास सूचित केले आहे. १८ वर्षांखालील मुलांसाठीही विशेष काळजी घेण्यासाठीचे नियोजन सादर करण्यास सांगितले आहे.
चाचण्या वाढविणार
सध्या कोरोनाचा कहर कमी झाला आहे. मात्र ग्रामीण भागात ओरड कायम आहे. त्यामुळे सीईओ आर.बी. शर्मा यांनी पाचही तालुक्यांना डॉक्टरांचे पथक नियुक्त करून आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये वसमत तालुक्यात डॉ. शिवाजी पतंगे, डॉ. मनीषा मोरे, कर्मचारी सुनंदा कुऱ्हाडे, प्रतीक्षा काळे, औंढ्यात डॉ. घुगे, डॉ. गिरी, साबळे, सोनिया वाकोडे, कळमनुरी तालुक्यात डॉ. शिवाजी माने, डॉ. सोनम साहू, एम.बी. दांडेगावकर, शुभांगी नाके, हिंगोलीत डॉ. अमोल दरगु, इंदूताई पेरके, सुरेखा इंगोले, रावसाहेब वाघोळे, सेनगाव तालुक्यात डॉ. गोरे, डॉ. शिंदे, सारिका तोमर, गणेश खोडके यांचे पथक नेमले आहे.
दिवसाआड तपासणी कॅम्प
वरील पथकामार्फत दिवसाआड तीन गावांत तपासणी कॅम्प होणार आहेत. २५ मे रोजी या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. आता २७ मे रोजी सेनगाव तालुक्यात खुडज, पुसेगाव, वसमत तालुक्यात सोमठाणा,वाई, औंढा तालुक्यात जडगाव, येडूद, निशाना, कळमनुरी तालुक्यात ढोलक्याची वाडी, भाटेगाव, हिंगोली तालुक्यात माळधामणी, इसापूर येथे तपासणी होईल. तर २९ मे रोजी सेनगाव तालुक्यात पळशी, सवना, वसमत तालुक्यात खांबाळा, मुडी, औंढा तालुक्यात जवळा बा., शिरड शहापूर, साळणा, कळमनुरी तालुक्यात पिंपरी खु., माळेगाव, हिंगोली तालुक्यात दाटेगाव व लोहगाव येथे कॅम्प होणार आहेत.