भारतीय संघाचा ऑलिम्पिक इतिहास आठवला तर पुरूष हॉकी संघाची यशोगाथा चटकन समोर उभी राहते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावावर 9 सुवर्ण, 7 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 28 पदकं आहेत. यापैकी आठ सुवर्ण ही पुरूष हॉकी संघाने जिंकून दिली आहेत. कालांतराने भारतीय हॉकी ऑलिम्पिक स्पर्धेत पिछाडीवर गेली, परंतु त्यांचा सुवर्ण इतिहास अजूनही अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे.
भारतीय पुरूष हॉकी संघाने 1928 ते 1956 अशी सलग सहा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकली. पण, त्यापैकी तीन पदकांची नोंद ही ब्रिटीश इंडिया संघाखाली झालेली आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला आणि पुढच्याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू तिरंग्याखाली खेळले. लंडन येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे 79 खेळाडू 10 क्रीडा प्रकारांत पदक पटकावण्यासाठी सहभागी झाले होते. पण भारताला त्या स्पर्धेत केवळ एकाच पदकावर समाधान मानावे लागले होते. हॉकी संघाने भारताला सुवर्णपदक पटकावून दिले.
स्वातंत्र्यानंतर तिरंग्याखाली भारताने पटकावलेले ते पहिलेच ऑलिम्पिक सुवर्णपदक होते. 12 ऑगस्ट 1948 हा तो ऐतिहासिक दिवस जेव्हा लंडनच्या विम्बेली स्टेडियमवर 25 हजार प्रेक्षकांसमोर तिरंगा डौलाने फडकला होता. इंग्रजांना भारतातून पिटाळल्यानंतर त्यांच्याच मायभूमीत त्यांना नमवून भारताने हे सुवर्णपदक जिंकले होते. बलबिर सिंग (Sr.) यांनी दोन गोल करत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांना पॅट्रीक जान्सेन आणि लिओ पिंटो यांनी प्रत्येकी एक गोलची साथ देत ग्रेट ब्रिटनचा 4-0 अशा धुव्वा उडवला.
भारत-पाकिस्तानचा संयुक्त संघ?
1948च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचा संयुक्त हॉकी संघ खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला आणि दोन्ही देशांनी आपापले स्वतंत्र संघ पाठवले. पाकिस्तानला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या पहिल्या लढतीत नेदरलँड्सने 1-1 अशी बरोबरी मिळवली आणि परतीच्या सामन्यात नेदरलँड्सने 4-1 असा विजय मिळवला. भारताचा सुवर्णमयी प्रवासविजयी वि. ऑस्ट्रीया 8-0विजयी वि. अर्जेंटिना 9-1विजयी वि. स्पेन 2-0 विजयी वि. नेदरलँड्स 2-1 (उपांत्य फेरी)विजयी वि. ग्रेट ब्रिटन 4-0 ( अंतिम)