नवी दिल्ली : राष्टÑीय क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी मंगळवारी मौन सोडले. ‘या निर्णयामागे वाईट हेतू दिसत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य लोकांना शिक्षा का देण्यात आली नाही,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. क्रीडा सचिव रवी मित्तल यांना लिहिलेल्या पत्रात, अल्पसंख्यक समुदायातील असल्यानेच माझ्यावर आकसापोटी कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. क्रीडा मंत्रालयात संपर्क केल्यानंतर एक अधिकारी म्हणाला, ‘मंत्रालयाने नियमानुसार कारवाई केली. हॉकी इंडियाला आधी पाठविलेल्या पत्रात स्थिती स्पष्ट केली आहे. यापेक्षा अधिक सांगण्यासारखे नाही.’ अहमद आपल्या पत्रात म्हणतात, ‘सुधांशु मित्तल, राजीव मेहता आणि आनंदेश्वर पांडे हे अनुक्रमे खो-खो, तलवारबाजी आणि हँडबॉल महासंघाचे प्रमुख या नात्याने क्रीडासंहिता मोडल्यानंतरही पदावर कायम कसे राहिले. क्रीडा मंत्रालयाने अध्यक्ष या नात्याने माझ्याविरुद्ध उशिरा केलेल्या कारवाईमागे जातीवादाचा गंध येतो. मी अल्पसंख्यक समुदायाचा असल्याने ही कारवाई झाली, अशी खात्री पटली आहे.’ (वृत्तसंस्था)
अल्पसंख्यक असल्यामुळेच माझ्यावर कारवाई - मुश्ताक अहमद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:17 AM