ढाका - ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले. भारताच्या भन्नाट खेळासमोर मलेशियन संघ पुरता निष्प्रभ ठरला. भारतीय हॉकी संघाने 6-2 इतक्या मोठया फरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे दोन सामन्यात चार गुण झाले असून, भारत गटात अव्वल स्थानावर आहे. काल दक्षिण कोरियाविरुध्दच्या लढतीत भारताल १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. अखेरच्या मिनिटाला गुरजंत सिंगने निर्णायक गोल करुन भारताचा पराभव टाळला होता.
दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुकांमधून भारतीय संघाने धडा घेतल्याचे दिसून आले. आक्रमक हॉकी खेळताना आपण किती धोकादायक आहोत ते भारताने आजच्या सामन्यातून दाखवून दिले. सुरुवातीपासून भारताने मलेशियावर वर्चस्व गाजवले. भारताने पाच मैदानी गोल केले.
आकाशदीप सिंगने (14वे मिनिट), एसके उथाप्पा (24 वे मिनिट), गुरजत सिंग (33 वे मिनिट), एसव्ही सुनिल (40 वे मिनिट) आणि सरदार सिंग (60 वे मिनिट) यांनी पाच मैदानी गोल केले. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये बदलला. मलेशियाकडून राझी रहीमने (50 व्या मिनिटाला) तर रामादान रोसीलने (59 व्या मिनिटाला) गोल केला. मलेशियाने शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले तो पर्यंत उशीर झाला होता.
दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर तिस-या क्वार्टरच्या शेवटच्या चार मिनिटांमध्ये जाँग जुन याने अप्रतिम गोल करत दक्षिण कोरियाला १-० अशी आघाडी मिळवूण दिली.यानंतर कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कोरियन बचाव भेदण्यात त्यांन सातत्याने अपयश आले. अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केला आणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.