ढाका : दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघाचा सामना आशिया कपमध्ये रविवारी ढाका येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या भारतीय संघाने पुल ए मध्ये बांगलादेश आणि जपानवर विजय मिळवला.सुरुवातीच्या सामन्यात जापानला ५-१ असे पराभूत केल्यानंतर मनप्रीत सिंहच्या नेतृत्वात संघाने बांगलादेशला ७-० असे पराभूत केले. दुसरीकडे पाकिस्ताननेदेखील बांगलादेशला ७-०ला पराभूत केले. तर जपानने त्यांना २ -२ असे बरोबरीवर रोखले. भारत पुल एमध्ये सहा गुण घेऊन आघाडीवर आहे. तर पाकिस्तान चार गुणांसह दुसºया स्थानावर आहे.भारत दोन विजयांसह सुपर चारमध्ये पोहचला आहे. मात्र संघ गटातील सर्व सामने जिंकून साखळी फेरीत अव्वल स्थानावर राहण्यास उत्सुक आहे.पहिल्या दोन सामन्यात भारताने शानदार खेळ केला. आणि गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. भारताने काही चांगले मैदानी गोलदेखील केले. मात्र पेनल्टी कॉर्नर ही चिंतेची बाब ठरली आहे. बांगलादेशविरोधात भारताने १३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र त्यापैकी दोनवर गोल करण्यात संघाला यश आले. प्रशिक्षक रोलेंट ओल्टेमन्स यांना हटवल्यावर एक महिन्यात पदभार स्वीकारणाºया मारिन यांच्यासाठी आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)
आशिया कप हॉकी : भारत-पाकिस्तानमध्ये रविवारी होणार लढत, साखळी फेरीतील तिस-या विजयासाठी भारत उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 3:39 AM